El Nino Impact Nashik  AI photo
नाशिक

El Nino Impact Nashik | 'एल निनो'च्या सावटात दुष्काळाचे मोठे आव्हान! फेब्रुवारी 2027 पर्यंत स्थिती कायम राहण्याचा अंदाज

El Nino Impact Nashik | फेब्रुवारी प्रभावाची शक्यता; पाणी, शेती आणि चाऱ्याच्या नियोजनाची कसोटी

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली असतानाच आता एल निनोच्या प्रभावामुळे आगामी काळातील पर्जन्यमान आणि तापमानाच्या स्थितीकडे प्रशासनाचे लक्ष लागले आहे.

जागतिक हवामान संघटनेच्या सप्टेंबरच्या अंदाजानुसार एल निनोची स्थिती फेब्रुवारी २०२७ पर्यंत कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पर्जन्यमानाच्या पद्धतीत बदल, उष्णतेच्या लाटा आणि टोकाच्या हवामान घटनांचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त १० तालुक्यांसह दुष्काळाच्या छायेत असलेल्या नाशिक व चांदवडमधील शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे.

नाशिक जिल्ह्यातील काही तालुक्यांत यापूर्वीच दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. १० तालुक्यांचा दुष्काळग्रस्त भागात समावेश करण्यात आला आहे. नाशिक व चांदवडच्या समावशाबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठा पुढील पावसाळ्यापर्यंत पुरविण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.

धरणे भरलेली असली तरी पिण्याचे पाणी, सिंचन, टँकरची पूर्वतयारी आणि भूजलपातळीचे काटेकोर नियोजन करणे आवश्यक आहे. दरम्यान, एल निनो फेब्रुवारीपर्यंत राहण्याचा अंदाज असला तरी त्याचा संपूर्ण २०२७ च्या मान्सूनवर तसाच परिणाम होईल, असे निश्चितपणे सांगता येत नाही. त्यामुळे हवामान निर्देशक, पर्जन्यमान, धरणसाठा आणि भूजलपातळीचा नियमित आढावा घेत पाणी, शेती आणि चाऱ्यासाठी आगाऊ कृती आराखडा तयार करण्याची गरज आहे.

शेती, पशुधनाचीही चिंता:

पर्जन्यमानात बदल झाल्यास खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यासाठी पीक पद्धती, सिंचनाची उपलब्धता आणि हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे. दुष्काळ लांबल्यास जनावरांसाठी चारा व पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकते. त्यामुळे चारा साठा आणि संभाव्य टंचाईग्रस्त गावांची पूर्वतयारी आतापासूनच करणे गरजेचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT