Eknath Shinde Pudhari
नाशिक

Eknath Shinde Parbhani Rally | परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सभेत गदारोळ; 'एक मराठा लाख मराठा'च्या जोरदार घोषणा!

Eknath Shinde Parbhani Rally | मराठा समाजाला न्याय देण्याची सरकारची भूमिका : एकनाथ शिंदे

पुढारी वृत्तसेवा

परभणी : पुढारी वृत्तसेवा

परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणारा शेतकरी मेळावा न घेण्याचा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी देऊनही हा मेळावा रविवारी पार पडला. शिंदे यांच्या आगमनापूर्वी घोषणाबाजी करणाऱ्या मराठा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

दरम्यान, शिंदे यांनी आपल्या भाषणात मराठा समाजाला न्याय देण्यासाठी महायुती सरकार काम करीत असल्याचे स्पष्ट केले. परभणीचे खा. संजय उर्फ बंडू जाधव यांनी क्रीडा संकुलात मेळाव्याचे आयोजन केले होते. परंतु सकाळी अकरा वाजेच्या सुमारास जरांगे यांनी आंदोलनस्थळावरूनच जाधव यांना मोबाईल करून मेळावा न घेण्याचा इशारा दिला.

मेळावा घेण्याचा प्रयत्न झाल्यास आपण स्वतः परभणीकडे येणार असल्याचा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला. तेव्हा जाधव यांनी लोक मेळावास्थळी आलेले असताना मेळावा रद्द करणे शक्य नसल्याचे सांगितले. अंतरवालीत मोबाईलवर चर्चा सुरू असताना तिथे घोषणाबाजी झाली. त्यामुळे मेळाव्याविषयी काहीसे संभ्रमाचे वातावरण होते.

आंदोलनकर्त्यांसोबत घोषणेत जाधव यांचा सहभाग

घोषणाबाजी करणाऱ्या आंदोलकांशी खा. संजय जाधव यांनी स्वतः थांबून संवाद साधला. यावेळी आंदोलकांच्या मागण्यांबाबत चर्चा करताना खा. जाधव यांनी 'मनोज जरांगे आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं' अशी घोषणा देत हात उंचावून आंदोलनकर्त्यांसोबत घोषणेत सहभाग घेतला. मात्र, काहीवेळ संवाद झाल्यानंतर खा. जाधव सभास्थळाकडे रवाना झाले आणि त्यानंतरही आंदोलकांची घोषणाबाजी सुरूच राहिली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अखेर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.

ते आपलेच आहेत म्हणत शिंदे यांची सामंजस्याची भूमिका

मेळाव्यात शिंदे यांनी भाषण सुरू केल्यानंतर काही आंदोलकांनी घोषणाबाजी करण्यास प्रारंभ केला. तेव्हा शिंदे यांनी ते आपलेच आहेत, असे सांगत सामंजस्याची भूमिका घेतली. मनोज जरांगे यांची तळमळ मला माहिती आहे. एक सर्वसामान्य कार्यकर्ता समाजासाठी लढतोय. मी मुख्यमंत्री असताना दोनवेळा जरांगेंच्या भेटीसाठी गेलो होतो. इतर समाजाचे आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका आम्ही घेतली, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

विखे पाटील उपसमितीवर काम करतात हेच दुर्दैव : जरांगे

परभणीच्या विषयावर आ. बच्चू कडू यांचा फोन आला. हा कार्यक्रम मराठ्यांच्या विरोधात नाही. बंडू जाधव यांनी त्या उद्देशाने कार्यक्रम घेतला असेल तर मला माहिती नाही, असे एकनाथ शिंदे म्हणाल्याचे बच्चू कडू यांनी जरांगे यांना सांगितले.

मी फक्त लढायचे शिकलेलो आहे. नुसत्या चर्चा करून काही फायदा नाही. चर्चा करून किती दिवस मराठा समाजावर अन्याय करू, वेळ मिळणार नाही. राधाकृष्ण विखे-पाटील यांना काय कळते, ते उपसमितीवर काम करतात तेच दुर्दैव आहे, अशी टीकाही मनोज जरांगे यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT