नाशिक : येथील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर शिवसेनेच्या प्रचारसभेत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. समवेत मंत्री नरहरी झिरवाळ, मंत्री दादा भुसे, मंत्री गुलाबराव पाटील, सुनील तटकरे, किशोर दराडे यांच्यासह शिवसेनेचे उमेदवार.  (छाया : हेमंत घोरपडे)
नाशिक

Eknath Shinde : दत्तक नाशिकची आईसारखी सेवा करू

‌‘नाशिकच्या विकासासाठी परिवर्तनाचा इतिहास घडवा‌’ ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भावनिक साद

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : काही लोकांनी नाशिक दत्तक घेतले होते, पण विकास झाला नाही. प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन नाशिकची आम्ही आईसारखी सेवा करू. नाशिकची प्रगती करू, असे नमूद करत नाशिकमध्ये तुम्हाला विकास हवा असेल तर परिवर्तन घडवावेच लागेल. तुमच्यात बदल करण्याची धमक आहे. बदलाचे वारे वाहत आहेत. नाशिकच्या विकासासाठी परिवर्तनाचा इतिहास घडवा, अशा शब्दांत नाशिककरांना भावनिक आवाहन करतानाच नाशिकचा मेकओव्हर करण्याचा निर्धार शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

मुंबई, ठाण्याच्या धर्तीवर पाचशे चौरस फुटांपर्यंतच्या घरांना घरपट्टी माफी, 50 टक्के इन्सेटिव्ह एफएसआय, पुण्याच्या धर्तीवर 9 मीटरपर्यंतच्या रस्त्यासमीप भूखंडांवर 30 मीटरपर्यंत उंचीच्या इमारतींना मंजुरी दिली जाईल, असे सांगत शिंदे यांनी नाशिककरांवर घोषणांचा पाऊस पाडला. महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना(शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार गट) उमेदवारांच्या प्रचारार्थ हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर आयोजित जाहीर सभेत उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते.

व्यासपीठावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील, माजी खासदार समीर भुजबळ, आ. सुहास कांदे, आ. हिरामण खोसकर, आ. किशोर दराडे, रिपब्लिकन सेनेचे अमन आंबेडकर आदी उपस्थित होते.

सभेच्या सुरुवातीलाच उपमुख्यमंत्री शिंदे यांनी, हे व्यासपीठ वैभव आहे; पण समोर बसलेली जनता हीच आमची खरी संपत्ती आहे, असे सांगून उपस्थितांशी भावनिक नाते जोडले. विधानसभा व नगरपालिकांच्या निवडणुकांत जनतेने दाखविलेल्या विश्वासाची पुनरावृत्ती महापालिकेतही होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नाशिककरांचे शिवसेनेच्या धनुष्यबाणावर व बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर असलेले प्रेम अधोरेखित करत, तेच प्रेम या निवडणुकीतही कायम राहावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नाशिकच्या विकासासाठी लवकरच महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय राबवले जातील, असे नमूद करत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नाशिककरांवर घोषणांचा पाऊस पाडला.

मुंबई, ठाण्याच्या धर्तीवर नाशिकमध्ये पाचशे चौरस फुटापर्यंतच्या घरांना घरपट्टी माफी दिली जाईल. पुणे शहराच्या धर्तीवर 90 मीटर रस्त्यांलगत असलेल्या इमारतींची उंची 30 मीटरपर्यंत वाढविण्याची तरतूद लागू केली जाईल. आचारसंहिता संपल्यानंतर हे निर्णय तातडीने अंमलात आणले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. एनएमआरडीएच्या माध्यमातून नाशिक महानगर क्षेत्रात विकासासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जाईल. निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. सिडकोची घरे फ्री-होल्ड करण्याचा निर्णय घेण्यात येईल, तसेच गोदावरी नदीच्या पुररेषेचे फेरसर्वेक्षण करून विस्थापितांना मदत दिली जाईल, असे ते म्हणाले.

मुंबई नाका आणि द्वारका चौकातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढला जाईल, अशी ग्वाही देण्यात आली. सिटीलिंक बससेवा अधिक प्रभावी करण्यात येईल. छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुलाच्या कामासाठी तसेच सेंट्रल पार्कच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र सुरू करणे, आरोग्यसेवा अधिक मजबूत करणे आणि सर्वसामान्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडविणे, हाच सरकारचा उद्देश असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. सरकार हे सामान्यांच्या मदतीसाठी आणि न्याय देण्यासाठीच असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

उद्योग, रोजगार आणि सांस्कृतिक वारसा ः नाशिक शहर व परिसरात उद्योगांसाठी अधिक जमीन उपलब्ध करून देण्यासाठी उद्योगमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. यामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नाशिकच्या समृद्ध साहित्यिक वारशाचे जतन करण्यासाठी वाचनालयांना तरतूद केली जाईल. कालिदास कलामंदिराचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले.

तपोवन वाचविण्याचा निर्धार ः 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे सूक्ष्म नियोजन करून तो भव्य, दिव्य आणि ऐतिहासिक करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. साधू-महंत व भाविकांसाठी आवश्यक त्या सुविधा शासनामार्फत उपलब्ध करून दिल्या जातील. तपोवन वाचविणे आणि पर्यावरणाचा समतोल राखणे ही नाशिककरांची भावना असून, त्याच अनुषंगाने कुंभमेळा पार पडेल, असे शिंदे म्हणाले. गोदावरी नदी आणि नाशिकचे अतूट नाते असून, गोदावरी प्रदूषणमुक्तसाठी उपाययोजना राबविल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.

परिवर्तनासाठी एकजुटीचे आवाहन ः भाषणाच्या शेवटी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी, आम्ही स्थगिती देणारे नाही, गती देणारे आहोत. आमचा अजेंडा केवळ विकासाचा आहे, असे सांगत उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. नाशिककरांना परिवर्तनासाठी एकजुटीने काम करण्याचे भावनिक आवाहन केले. नाशिकच्या विकासाचा व समृद्धीचा निर्धार करण्याची हीच वेळ असल्याचे सांगत, येत्या 15 तारखेला महापालिकेवर विकासाचा झेंडा फडकविण्याचे आवाहन त्यांनी केले.

बडगुजर, पाटील पुन्हा निशाण्यावर

ही सलीम कुत्ताची लढाई नाही, आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. विधानसभेत इतका विषय गाजून देखील त्यांना तिकीट देतात, असे नमूद करत सुधाकर बडगुजर आणि दिनकर पाटील यांच्यावर मंत्री गुलाबराव पाटील यांना निशाणा साधला. ते म्हणाले की, काल मनसेचे भूत आले होते. मनसे-सेना युतीचा आनंदोत्सव साजरा करणारे दुसऱ्या दिवशी भाजपात प्रवेश करतात, असे नाटकी लोक आम्ही कुठेही पाहिले नाहीत, असा टोला दिनकर पाटील यांना मंत्री पाटील यांनी लगावला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT