Dada Bhuse Online Pudhari
नाशिक

Education Minister Dada Bhuse : आरक्षणाचा तिढा सुटताच राज्यात मेगा शिक्षक भरती

शिक्षणमंत्री दादा भुसे : कला, क्रीडा शिक्षकांनाही प्राधान्य

पुढारी वृत्तसेवा

ठळक मुद्दे

  • राज्यभरातील शाळांमध्ये शिक्षकांची अनेक पदे रिक्त

  • आरक्षणासंदर्भातील विषय मार्गी लागताच राज्यात मेगा शिक्षक भरती प्रक्रिया सुरू केली जाईल

  • भरतीमध्ये केवळ विषय शिक्षकांनाच नव्हे, तर कला आणि क्रीडा शिक्षकांनाही प्राधान्य दिले जाणार

पुढारी वृत्तसेवा : राज्यातील हजारो शिक्षक पदांच्या रिक्त जागा भरण्याची प्रतीक्षा करणार्‍या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आरक्षणासंदर्भातील विषय मार्गी लागताच राज्यात मेगा शिक्षक भरती प्रक्रिया सुरू केली जाईल, अशी घोषणा राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी शुक्रवारी (दि.8) चंद्रपूर येथे केली. या भरतीमध्ये केवळ विषय शिक्षकांनाच नव्हे, तर कला आणि क्रीडा शिक्षकांनाही प्राधान्य दिले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत बोलताना भुसे यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, राज्यभरातील शाळांमध्ये शिक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांसंदर्भात नेमलेल्या समितीने नुकताच आपला अहवाल शासनाला सादर केला आहे.

या अहवालाच्या आधारे आरक्षणाचा मुद्दा निकाली काढून लवकरच भरती प्रक्रिया सुरू केली जाईल. ही भरती पूर्णपणे आरक्षण धोरणानुसारच होईल, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी त्यांनी शिक्षण विभागाच्या अधिकार्‍यांना महत्त्वाचे निर्देशही दिले. अधिकार्‍यांनी गावपातळीवरील शाळांना नियमित भेटी द्याव्यात, जेणेकरून स्थानिक अडचणी जागेवरच सुटतील, असेही ते म्हणाले.

शाळांना अधिकाधिक निधी उपलब्ध करून देण्याबरोबरच सीएसआर फंड आणि खनिज विकास निधीसारख्या स्थानिक स्रोतांमधूनही निधी उभारण्याचे आवाहनही त्यांनी केले.

शिष्यवृत्ती परीक्षा पुन्हा सुरू करण्याचा विचार

चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा पुन्हा सुरू करण्याच्या विचारात राज्य सरकार असल्याचेही मंत्री दादा भुसे यांनी सांगितले. शाळांमधील पटसंख्या वाढवणे आणि ‘आधार अपार’ ओळखपत्राचे काम या महिनाअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. बैठकीनंतर विविध शिक्षक संघटनांच्या शिष्टमंडळांनी शिक्षणमंत्र्यांची भेट घेऊन आपली निवेदने दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT