Edible Oil Prices Hike Pudhari
नाशिक

Edible Oil Prices Hike | दिवाळीच्या तोंडावर खाद्यतेलाच्या दरात वाढ झाल्याने ग्राहकांचे आर्थिक गणित कोलमडले

Edible Oil Prices Hike | दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना, खाद्यतेलांच्या वाढत्या किंमतीमुळे सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरचे आर्थिक गणित बिघडण्याची चिन्हे आहेत.

पुढारी वृत्तसेवा

  • दिवाळीच्या फराळाचा खर्च वाढणार

  • शेंगदाणा तेल २११, सूर्यफूल १९० रुपये किलो

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना, खाद्यतेलांच्या वाढत्या किंमतीमुळे सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरचे आर्थिक गणित बिघडण्याची चिन्हे आहेत. शेंगदाणा, सूर्यफूल, सोयाबीन आणि पामतेलाच्या किमती चढ्या पातळीवर असल्याने गृहिणींना वाढीव खर्चाचा सामना करावा लागत आहे. दिवाळीच्या फराळासाठी तसेच मिठाई, चकली, करंजी, अनारसे आणि इतर तळण्याच्या पदार्थासाठी तेलाची मागणी वाढणार असल्याने यंदा सणाचा खर्चही वाढण्याची शक्यता आहे.

१ नोव्हेंबरपासून वाढलेल्या तेलांच्या किमतींनुसार, शेंगदाणा तेलाचा सरासरी किरकोळ दर २१०.५८ रुपये किलो, मोहरीचे तेल २०८.८२ रुपये, सूर्यफूल तेल १९०.३८ रुपये, सोयाबीन तेल १६७.५८ रुपये, तर पामतेल १५४.११ रुपये किलो आहे. भारताची खाद्यतेलाची मोठी गरज आयातीवर अवलंबून आहे. आंतरराष्ट्रीय बाजार दर, आयात खर्च, वाहतूक आणि रुपयाच्या विनिमय दरातील चढ-उतार यांचा परिणाम देशांतर्गत बाजारावर होत आहे.

सणासुदीच्या काळातील वाढती मागणीही दरांवर परिणाम करणारा घटक ठरत आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने सप्टेंबरमध्ये कच्च्या सूर्यफूल तेलावरील मूलभूत आयात शुल्क शून्य केले, तर सोयाबीन आणि पामतेलावरील शुल्क १० टक्क्यांवरून ५ टक्क्यांपर्यंत कमी केले. त्याचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देशही देण्यात आले होते.

मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढत्या किंमतीमुळे खाद्यतेलाचे दर अद्याप चढ्या पातळीवर आहेत. दिवाळीच्या फराळासाठी मोठ्या प्रमाणावर तेलाची खरेदी करावी लागणार असल्याने मध्यमवर्गीय कुटुंबांचे घरगुती बजेट कोलमडण्याची शक्यता आहे. विशेषतः, खाद्यतेलाच्या किमती वाढल्याने घरगुती वापरासोबतच हॉटेल, खानावळी, मिठाई आणि फराळ विक्रेत्यांच्या उत्पादन खर्चातही वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

खाद्यतेलांचे सरासरी किरकोळ दर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT