भोंदू बाबा अशोक खरात याला सक्तवसुली संचालनालयास (ED)अटक करण्‍याची परवानगी मिळाली आहे.  Pudhari
नाशिक

ashok kharat case |भोंदू अशोक खरातला अटक करण्‍याची 'ईडी'ला मिळाली परवानगी

बुधावारी सकाळी रिमांडसाठी पुन्हा कोर्टात हजर करण्याची सूचना

पुढारी वृत्तसेवा

ed gets permission to arrest ashok kharat

नाशिक, पुढारी वृत्तसेवा : भोंदू बाबा अशोक खरात याला सक्तवसुली संचालनालयास (ED)अटक करण्‍याची परवानगी मिळाली आहे. मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा (PMLA) न्यायालयाकडून ईडीला खरात याच्या अटकेची रीतसर परवानगी मिळाली असून, उद्या (बुधवार) सकाळी ११:३० वाजेपर्यंत त्याला रिमांडसाठी पुन्हा न्यायालयात हजर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

न्यायालयात सुनावणी आणि रिमांडचे आदेश

अशोक खरातला आज विशेष पीएमएलए (PMLA) न्यायालयात हजर करण्यात आले होते. ईडीने न्यायालयात खरातच्या अटकेची मागणी केली जी न्यायालयाने मान्य केली. आता बुधवारी सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत खरातला पुढील कोठडीसाठी पुन्हा कोर्टात हजर केले जाणार आहे.

भक्तांच्या नावे बनावट खाती आणि हवाला रॅकेट

आजच्‍या सुनावणीवेळी सक्तवसुली संचालनालयाच्‍या (ED) अधिकार्‍यांनी न्‍यायालयात सांगितले की, अशोक खरात याने त्याच्याकडे येणाऱ्या भक्तांच्या नावावर आणि इतरांकडून कागदपत्रे गोळा करून तब्बल ६१ हून अधिक बँक खाती उघडल्याचे तपासात समोर आले आहे. यामध्ये प्रामुख्याने अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील राहता येथील समता पतसंस्थेत १०० हून अधिक बनावट खाती, तर नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील जगदंबा पतसंस्थेत ३२ बनावट खाती उघडण्यात आली होती. या सर्व बनावट खात्यांवर अशोक खरात स्वतः 'नॉमिनी' (वारसदार) होता आणि ही सर्व खाती तो स्वतःच हाताळत होता. या खात्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर हवाला रॅकेटचे व्यवहार केले जात होते. धक्कादायक बाब म्हणजे, या बनावट खात्यांमध्ये चाकणकर भगिनींसह आरटीओ (RTO), महसूल आणि आयकर विभागातील अधिकाऱ्यांच्या नावाचाही समावेश आहे. या सर्वांना यापूर्वीच ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले होते.

कोट्यवधींची फसवणूक आणि बड्या व्यावसायिकांशी कनेक्शन

अशोक खरात विरोधात नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात प्रेडिकेट गुन्हा (मूळ गुन्हा) दाखल असून, याच आधारावर ईडीने त्याच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा नोंदवला आहे. व्यावसायिक राजेंद्र जासूद यांच्या तक्रारीवरून हा मूळ गुन्हा दाखल झाला होता. जासूद यांच्याकडून पूजेअर्च्या आणि धार्मिक विधींच्या नावाखाली खरातने कोट्यवधी रुपये उकळल्याचा आरोप आहे. खरातने स्वतःच्या फार्महाऊससाठी लागणारे महागडे फर्निचरही जासूद यांच्याच पैशांमधून मागवले होते. तपासादरम्यान व्यावसायिक राजेंद्र जासूद, दिनेश परब आणि सीए (CA) ललित पोफळे यांच्याशीही खरातचे आर्थिक व्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. सीए ललित पोफळे याच्या माध्यमातून खरात नॉमिनी असलेल्या बँकेत मोठे आर्थिक व्यवहार झाल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय राहता बँक आणि समता बँकेतही त्याची खाती सापडली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT