Dahanu Talasari Earthquake Pudhari
नाशिक

Earthquake Monitoring | मसगा महाविद्यालयात भूकंपमापक केंद्र सुरू

Earthquake Monitoring | मालेगावात भूकंपीय हालचालींवर आता 'वॉच'

पुढारी वृत्तसेवा

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा
भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या नोडल संस्थेअंतर्गत मसगा महाविद्यालयाच्या परिसरात राष्ट्रीय भूकंपमापक केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. देशातील हे १७५ वे, तर महाराष्ट्रातील १७ वे भूकंपमापक केंद्र ठरले आहे. या केंद्राचे उद्घाटन राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राचे वैज्ञानिक डॉ. ए. पी. सिंह आणि मसगा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांच्या हस्ते करण्यात आले.

उद्घाटनप्रसंगी रिसर्च असिस्टंट प्रभात पांडे व नितीशकुमार सिंग यांच्यासह महाविद्यालयातील अधिकारी, प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. शहर व परिसरातील भूकंपीय हालचालींच्या शास्त्रीय नोंदी आणि अभ्यासाला आता मोठी चालना मिळणार आहे.


राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या माध्यमातून देशभरात भूकंपीय हालचालींच्या अचूक नोंदी घेण्यासाठी भूकंपमापक केंद्रांचे जाळे उभारण्यात येत आहे. त्याच उपक्रमांतर्गत मालेगावात हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रातील यंत्रणा २४ तास कार्यरत राहणार असून, परिसरातील भूकंपीय हालचालींची सातत्याने नोंद घेणार आहे. जमिनीतील सूक्ष्म कंपने, भूकंपीय लहरी, त्यांची तीव्रता, वारंवारता तसेच भूकंपाच्या केंद्रबिंदूविषयीच्या अभ्यासासाठी या नोंदी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.

मसगा महाविद्यालयातील भूकंपमापक यंत्राद्वारे संकलित होणारा भूकंपीय डेटा नवी दिल्ली येथील नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (एनसीएस) च्या केंद्रीय प्राप्ती केंद्राकडे पाठवण्यात येणार आहे. तिथे या माहितीचे संकलन, विश्लेषण आणि शास्त्रीय अभ्यास केला जाणार आहे.

त्यामुळे मालेगावसह उत्तर महाराष्ट्रातील तसेच आसपासच्या प्रदेशातील भूकंपीय हालचालींच्या अचूक नोंदी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. तसेच शेजारील देशांमधील भूकंपीय घटनांच्या अभ्यासासाठीही या केंद्रातून मिळणारी माहिती उपयुक्त ठरू शकते.

मालेगाव परिसरात यापूर्वी जाणवलेल्या भूकंपीय हालचालींच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर सातत्याने वैज्ञानिक निरीक्षणाची सुविधा उपलब्ध होणे महत्त्वाचे मानले जात आहे. भूकंपाच्या घटनांचा अभ्यास, जमिनीतील हालचालींचे निरीक्षण आणि संभाव्य भूकंपीय जोखमीचे आकलन करण्यासाठी या केंद्रातील नोंदी उपयुक्त ठरणार आहेत.


नाशिक जिल्ह्यात मेरी येथे कायमस्वरूपी भूकंपमापक केंद्र कार्यरत आहे. त्यानंतर मालेगावतील मसगा महाविद्यालयातही कायमस्वरूपी केंद्र सुरू झाले आहे. बागलाण तालुक्यातील हरणबारी आणि सुरगाणा येथील केंद्र तात्पुरत्या स्वरूपाची आहेत. त्यामुळे मालेगावतील केंद्रामुळे उत्तर महाराष्ट्रातील भूकंपीय हालचालींच्या सातत्यपूर्ण आणि शास्त्रीय निरीक्षणाला अधिक बळ मिळणार आहे.

विद्यार्थ्यांना संशोधनाची संधी

महाविद्यालयाच्या परिसरातच अत्याधुनिक भूकंपमापक यंत्रणा उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांना भूकंपशास्त्र आणि भूकंपीय हालचालींचा प्रत्यक्ष अभ्यास करता येणार आहे. या केंद्रातून उपलब्ध होणाऱ्या वैज्ञानिक माहितीचा उपयोग विद्यार्थी, संशोधक आणि प्राध्यापकांना विविध प्रकल्प, अभ्यास तसेच संशोधनासाठी करता येणार आहे. त्यामुळे मसगा महाविद्यालयाच्या शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्राला यामुळे नवी दिशा मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT