दिंडोरीत 39 हजार 369 शिधापत्रिकांची ई-केवायसी झालेली नाही
ई-केवायसी न झाल्याने रेशन येत्या 1 सप्टेंबरपासून बंद होणार
उर्वरित शिधापत्रिकाधारकांची ई-केवायसी नोंदणी पूर्ण केली जाईल.
दिंडोरी (नाशिक) : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारकांना ई-केवायसी करण्यासाठी दि. 31 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. या मुदतीत तालुक्यातील एकुण 2 लाख 43 हजार 985 शिधापत्रिकाधारकांपैकी 2 लाख 4 हजार 616 शिधापत्रिकाधारकांची ई-केवायसी पूर्ण झाली आहे. तालुक्यातील 39 हजार 369 शिधापत्रिकांची ई-केवायसी न झाल्याने त्यांचे रेशन येत्या 1 सप्टेंबरपासून बंद होणार आहे.
केंद्र सरकारकडून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत अंत्योदय व प्राधान्य रेशनकार्ड धारक कुटुंबांना महिन्याकाठी मोफत धान्य वितरित केले जाते. या योजनेत सुसूत्रता आणताना समाजातील गरजूंना धान्याचा लाभ मिळावा यासाठी ई-केवायसी नोंदणी बंधनकारक केली आहे. दि. 31 जुलैपर्यंत सर्व ई- केवायसी नोंदणी पूर्ण करण्याच्या सूचना शासनाने दिल्या होत्या, त्या धर्तीवर धान्य दुकानात काम सुरू होते, त्यानुसार शिधापत्रिकाधारकांना वेळोवेळी आवाहन करूनही ई-केवायसी नोंदणी करण्याकडे हजारो शिधापत्रिकाधारकांनी दुर्लक्ष केले. परिणामी, त्यांना आता धान्यापासून वंचित राहावे लागणार आहे.
तालुक्यातील 84 टक्के शिधापत्रिकाधारकांनी ई-केवायसी नोंदणी पूर्ण केली असून, 16 टक्के शिधापत्रिका धारकांची ई-केवायसी नोंदणी बाकी आहे. त्यांना येत्या 1 सप्टेंबरपासून धान्यपुरवठा बंद होईल. शासनाने दिलेली मुदत दि. 31 जुलैला संपली असून, शासनाने पुन्हा मुदत वाढवून दिली तर उर्वरित शिधापत्रिकाधारकांची ई-केवायसी नोंदणी पूर्ण केली जाईल.अक्षय लोहारकर, पुरवठा निरीक्षक