

नाशिक : नाशिक शहर शिधापत्रिकाधारकांच्या ई-केवायसीमध्ये आघाडीवर असून, आतापर्यंत 79 टक्के म्हणजेच 3 लाख 41 हजार 406 कार्डधारकांनी प्रक्रिया पूर्ण केली आहे. जिल्ह्यातही हे काम वेगाने सुरू असून सध्या 72 टक्के शिधापत्रिकाधारकांनी ई-केवायसी पूर्ण केलेली आहे.
जिल्ह्यात १३ लाख २९ हजार शिधापत्रिकाधारक आहेत. या कुटुंबातील ३८ लाख ३५ हजार २८८ सदस्यांची ई-केवायसी करण्याचे जिल्हा पुरवठा विभागापुढे लक्ष होते. त्यानुसार आजघडीला २७ लाख ६८ हजार ६१४ जणांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली असून, १० लाख ६६ हजार ६७४ सदस्यांची प्रक्रिया अजूनही अपूर्ण आहे. शासनाने नेटवर्कच्या समस्येवर तोडगा काढत 'केवायसी'साठी मोबाइल अॅप विकसित केले आहे. त्यामुळे नागरिक घरबसल्या केवायसी करू शकतील. यासंदर्भात राज्य शासनाने 28 फेब्रुवारी रोजी सूचनाही काढली होती. दरम्यान, जिल्ह्यातील ७२ टक्के काम पूर्ण झाले असून त्यात नाशिक विभाग प्रथम क्रमांकावर असल्याची माहिती धान्य पुरवठा अधिकारी गणेश जाधव यांनी दिली.
शासनाने रेशनधारकांना केवायसी करणे बंधनकारक केले आहे. यासाठी मुदतही देण्यात आली. मात्र, त्या मुदतीत सगळ्याच शिधापत्रिकांचे ई-केवायसी होण्याची शक्यता नसल्याने मेरा-केवायसी हे मोबाइल अॅप विकसित करण्यात आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात नाशिक शहरातील पुरवठा विभाग आघाडीवर असून तीन लाख ४१ हजार ४०६ शिधापत्रिकाधारकांची केवायसी पूर्ण झाली आहे.
ई-केवायसी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी राष्ट्रीय सूचना केंद्र, नवी दिल्ली यांनी मेरा-केवायसी मोबाइल अॅप विकसित केले आहे. त्यामुळे लाभार्थी स्वतः त्यांच्या मोबाइलमधून केवायसी पूर्ण करू शकतील. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत ज्या लाभार्थींनी रास्तभाव दुकानांमध्ये जाऊन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसेल, त्यांच्याकरिता मेरा-केवायसी मोबाइल प्रणाली सोयीची ठरणार आहे.
नाशिक कार्यालय : 79.2
निफाड : 77.55
येवला : 77.37
सिन्नर : 77.26
देवळा : 77.52
पेठ : 75.50
त्र्यंबकेश्वर : 74.60
नाशिक : 74.56
सुरगाणा : 73.87
चांदवड : 69.02
इगतपुरी : 68.76
मालेगाव : 68.28
दिंडोरी : 67.78
बागलाण : 67.71
नांदगाव : 67.27
कळवण : 65.95
मालेगाव कार्यालय : 63.24