नाशिक : द्वारका चौकात मंत्री भुजबळ यांनी या अचानक केलेल्या पाहणी दौऱ्यानंतर पोलिसांनी ॲक्शन मोडवर येत परिसरात अनाधिकृतपणे पार्क केलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. यामुळे काही काळ वाहनधारकांची चांगलीच तारांबळ उडाली.
भुजबळ यांनी अचानक चौकाचा पाहणी दौरा करीत, वाहतुक कोंडीवर उपाययोजनांबाबत अधिकाऱ्यांना निर्देश दिले. तसेच अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढत, मुंबई नाका ते द्वारका परिसरात उड्डाण पुलाखाली बसलेल्या भिक्षेकरींचा मुद्दा उपस्थित केला. सर्व्हिस रोडवर अतिक्रमणाबाबतही अधिकाऱ्यांना कडक जाब विचारला. अनधिकृतपणे उभ्या केलेल्या वाहनांबाबत वाहतुक पोलिसांच्या कामगिरींवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ सर्व्हिस रोडवर उभ्या केलेल्या वाहनांची टोइंग करत वाहन मालकांवर दंडात्मक कारवाई केली. पोलिसांच्या या कारवाईनंतर परिसरात चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. दरम्यान, उशिरा का होईना पोलिसांनी केलेल्या कारवाईबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
ट्रॅक्टर हाऊस ते मुंबई नाका लगतच्या सर्व्हिस रोडवर सर्रासपणे भंगार वाहने उभी केली जातात. वर्षानुवर्षांपासून ही वाहने रस्त्याच्या कडेला पडून आहेत. बहुतांश वाहने अपघातग्रस्त असून, त्यांचे मुळ मालक कोण? हे तपासण्याची तसदी देखील पोलिसांकडून घेतली जात नाही. या वाहनांमुळे देखील वाहतुक कोंडीची समस्या उद्भवत असून, आता तरी पोलिस भंगार वाहने रस्त्यावरून हटविणार काय? असा सवाल परिसरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.