Road pudhari photo
नाशिक

Dwarka to Nashik Road | द्वारका-नाशिकरोड रस्ता होणार दहा पदरी

Dwarka to Nashik Road | आठ किलोमीटर लांबी; सुधारित प्रस्ताव आज न्हाईला सादर होणार

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर द्वारका ते नाशिकरोड या आठ किलोमीटर लांबीचा रस्ता दहा पदरी होणार आहे. यासंदर्भात महापालिकेने २७६ कोटींचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (न्हाई) ला सादर केल्यानंतर सोमवारी या प्रस्तावात फेरबदल्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार महापालिकेच्या पथकाकडून मंगळवारी (दि.१०) सुधारित प्रस्ताव सादर केला जाणार असून, मंगळवारी या प्रस्तावावर निर्णय अपेक्षित आहे.

शहरातील मुख्य चौक असलेल्या द्वारका सर्कल भागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. या चौकात मुंबई आग्रा रोड आणि नाशिक-पुणे हे दोन महामार्ग एकत्र येतात. याशिवाय शहरातील विविध भागांतून येणारे सहा रस्ते या चौकात एकत्र येतात. त्यामुळे या चौकात वाहतूक कोंडी नित्याची बनली आहे.

द्वारका चौकासह बोधलेनगर, गांधीनगर, उपनगर, नेहरूनगर परिसरातील वाहतुकीची कोंडी कायमची सुटावी, यासाठी चार वर्षांपूर्वी भारतमाला योजनेंतर्गत द्वारका ते दत्तमंदिर उड्डाणपूल मंजूर करण्यात आला होता. परंतु, मेट्रो निओमुळे हा उड्डाणपूल अडचणीत आला होता. परंतु मेट्रो निओ प्रकल्प जवळपास रद्द झाल्यात जमा झाला आहे.

त्यामुळे डबलडेकर पूलदेखील रद्द होणार आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी या मार्गाच्या रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव न्हाईकडे सादर केला आहे. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर सदरचा रस्ता रुंदीकरणाबाबत न्हाई आणि महापालिकेच्या प्रशासनांमध्ये बैठकांचा जोर सुरू आहे. त्यामुळे २७६ कोटींच्या या दहा पदरी रस्त्याला मंजुरी मिळणार असल्याचे चित्र आहे.

मंगळवारी न्हाईसोबत पुन्हा बैठक

द्वारका ते नाशिकरोड सरसकट दहा पदरी केला जाणार आहे. त्यासाठी न्हाईने महापालिकेच्या प्रस्तावात काही सुधारणा सुचविल्या आहेत. न्हाई आणि मनपा अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पुन्हा मंगळवारी होणार आहे. त्यात या प्रस्तावाला मंजुरी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर द्वारका ते नाशिकरोड रस्त्यावरील वाहतूक कोंडीतूनही नाशिककरांची सुटका होण्याची शक्यता आहे.

मेट्रो, डबलडेकर पुलावरही फुली

केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी भारतमाला योजनेंतर्गत द्वारका ते नाशिकरोड उड्डाणपूल मंजूर केला होता. मेट्रो निओचा प्रस्ताव पुढे आल्यानंतर या ठिकाणी डबल डेकर उड्डाणपुलाचा प्रस्ताव समोर आला. नाशिकरोड ते द्वारकादरम्यान उड्डाणपूल आणि त्यावर मेट्रो धावणार होती. परंतु आता सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर हा रस्ता दहा पदरी होणार असल्यामुळे डबलडेकर उड्डाणपुलाचा प्रस्तावही बासनात गेला आहे.

वाहतूक कोंडीने वाहनधारक त्रस्त

द्वारका सर्कल हा शहरातील मध्यवर्ती ठिकाण असून, येथे पुणे, मुंबई, मालेगाव, छत्रपती संभाजीनगर या मार्गावर जाणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे या ठिकाणी दिवसभर वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. येथील कोंडी फोडण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महापालिका तसेच पोलिस प्रशासनाकडूनही अनेक प्रयत्न झाले, मात्र वाहनांची होणाऱ्या गर्दीमुळे कोंडी फोडण्यास अद्याप तरी म्हणावे तसे यश मिळालेले नाही.

दरम्यान सिंहस्थ कुंभमेळा पार्श्वभूमीवर द्वारका येथून होत असलेल्या दहा पदरी मार्गामुळे वाहतूक कोंडी सुरळीत होणार आहे. येथील प्रत्यक्ष कामालादेखील सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुढील काही महिने हे काम सुरू राहणार असल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडी अधिकच होणार आहे. त्यामुळे नाशिककरांना हा त्रास सहन काही महिने सहन करावा लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT