नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६० वरील द्वारका सर्कल ते दत्त मंदिर चौक या सुमारे ५.६५० किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या दहापदरीकरणाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. या कामासाठी राबवण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत १२ ठेकेदार पात्र ठरले असून, व्ही. पी. सेठी या कंपनीने सर्वात कमी म्हणजेच ३८ टक्के कमी दराची निविदा भरली आहे.
कंपनीने सुमारे १३८ कोटी रुपयांमध्ये काम करण्याची तयारी दर्शविल्यामुळे महापालिकेची तब्बल ८४ कोटी रुपयांची बचत होणार आहे. द्वारका सर्कल ते दत्त मंदिर चौक हा मार्ग सध्या २४ ते ३० मीटर रुंदीचा आहे. रस्ता हक्क क्षेत्रात आहे. सिंहस्थापूर्वी हा मार्ग ४५ मीटर रुंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रस्ता सहापदरी करण्याबरोबरच दोन्ही बाजूंना प्रत्येकी दोन पदरी सेवा रस्ते उभारण्याचे नियोजन आहे.
त्यामुळे द्वारका ते नाशिकरोड दरम्यानची वाहतूक कोंडी कमी होण्यास मोठी मदत होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या प्रादेशिक कार्यालयाने यासंदर्भात नाशिक महापालिका आयुक्तांना पत्र पाठविले आहे.
मंत्रालयाने दि. ३ जून २०२६ रोजी या प्रकल्पाला मंजुरी देत २२१ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. प्रकल्पाच्या तांत्रिक नोंदीनुसार, सहापदरी रस्ता आणि सेवा रस्त्यांसाठी एकूण ४५ मीटर रुंदीची जागा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
१२ ठेकेदार पात्र; ३८ टक्के कमी दराने निविदा:
रस्ता रुंदीकरणासाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया राबविली. या प्रक्रियेत एकूण १५ मक्तेदारांनी सहभाग घेतला होता. छाननीनंतर त्यापैकी १२ मक्तेदार कंपन्या पात्र ठरल्या. पात्र ठरलेल्या कंपन्यांमध्ये व्ही. पी. सेठी या कंपनीने सर्वात कमी दराची निविदा भरली. अंदाजित किमतीपेक्षा ३८ टक्के कमी दराने, सुमारे १३८ कोटी रुपयांत हे काम करण्याची तयारी कंपनीने दर्शविली आहे.
९० टक्के जागा ताब्यात असल्याचा मनपाचा दावा:
प्रकल्पाला मंजुरी देताना ४५ मीटर रुंदीची जागा उपलब्ध करून देण्याची अट घालण्यात आली आहे. तसेच, ४५ मीटर रुंद रस्त्यापैकी ९० टक्क्यांहून अधिक क्षेत्रासाठी भूसंपादन कायद्याच्या कलम ३ जी अंतर्गत निवाडा आणि 'लेटर ऑफ अवॉर्ड' देण्याची अट होती. त्यानुसार मनपाने भूसंपदानाची प्रक्रिया सुरू केली असून, सुमारे ९० टक्के जागा ताब्यात आल्याचा दावा केला आहे. हा प्रकल्प ईपीसी (इंजिनिअरिंग, प्रोक्योरमेंट अँड कन्स्ट्रक्शन) पद्धतीने राबविण्यात येणार आहे. आवश्यक जागा मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्यामुळे प्रत्यक्ष काम सुरू करण्याचा मार्गही आता मोकळा झाला आहे.
"निविदा प्रक्रियेत १२ मक्तेदार पात्र ठरले होते. त्यापैकी व्ही. पी. सेठी या मक्तेदाराने ३८ टक्के कमी दराची निविदा भरल्याने महापालिकेची मोठी बचत झाली आहे. सिंहस्थापूर्वी रस्ता रुंदीकरणाचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे."— मनीषा खत्री, आयुक्त, महापालिका