नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील वाहतुकीचा अत्यंत महत्त्वाचा केंद्रबिंदू असलेल्या द्वारका सर्कल येथे पुणे बाजूकडे जाणाऱ्या अंडरपासच्या बांधकामाला लवकरच सुरुवात होणार आहे. द्वारका सर्कल येथे शहरातील चार प्रमुख रस्ते व सात उपरस्ते एकत्र येत असल्याने येथे कायमच मोठ्या प्रमाणात वाहतूक दाब असतो.
या अंडरपासच्या बांधकामामुळे होणारी वाहतूक कोंडी, अपघातांची शक्यता व नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी द्वारका चौकात सर्व जड व अवजड वाहने, खासगी प्रवासी बसेस, एसटी बसेस तसेच सिटीलिंक बसेस यांना पुढील तीन महिन्यांसाठी प्रवेश बंद करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
द्वारका परिसरातील वाहतूक सुरळीत व सुरक्षित राहावी, यासाठी या सर्व वाहनांची वाहतूक पर्यायी मागनि वळविणे अत्यावश्यक असल्याची खात्री पोलिस प्रशासनाने केली आहे. त्यानुसार वाहतूक नियमन व नियंत्रणासाठी ही अधिसूचना सहायक पोलिस आयुक्त (मुख्यालय/वाहतूक) संदीप मिटके यांनी मोटार वाहन कायदा १९८८ अन्वये प्रदत्त अधिकारांचा वापर करून निर्गमित केली आहे.
अधिसूचनेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर मोटार वाहन अधिनियम १९८८ अंतर्गत कलम ११९/१७७, १२२/१७७, २०७ तसेच अन्य लागू कायद्यांनुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे. नागरिकांनी, वाहनचालकांनी व बस मालकांनी या बदलांची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्ग
नाशिकरोड येथून मुंबईकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना (फक्त रात्री १० ते सकाळी ८ या वेळेत) सिन्नर फाटा, दत्तमंदिर सिग्नल, फेम सिग्रल, रविशंकर मार्ग, वडाळा गाव सर्कल, पाथर्डी फाटा, गरवारे पॉइंट मार्गे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ वापरणे बंधनकारक राहणार आहे. सिन्नरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे.
हलक्या वाहनांसाठी मार्ग व हाइट बॅरिअर
हलकी वाहने पुणे-मुंबई, पुणे-त्र्यंबकेश्वर, मुंबई नाका-नाशिकरोड व पंचवटीच्या दिशेने पर्यायी मागनि वळविण्यात येणार आहेत. काठे गल्ली, वडाळा नाका, फेम सिग्नल, ट्रॅक्टर हाउस, सारडा सर्कल तसेच मुंबई व धुळे बाजूकडील रॅम्पवर हाइट बॅरिअर पॉइंट उभारण्यात येणार आहेत.
अवजड वाहनांना प्रवेश बंद
द्वारका चौक नाशिक येथे ये-जा करणाऱ्या सर्व जड व अवजड वाहने, खासगी प्रवासी बसेस, एसटी बसेस व सिटीलिंक बसेस यांना पुढील तीन महिने प्रवेशबंदी राहणार आहे. ही अधिसूचना ३० जानेवारी २०२६ ते २९ एप्रिल २०२६ या कालावधीत प्रायोगिक तत्त्वावर लागू राहणार आहे.