रावणदहन pudhari file photo
नाशिक

Dussehra Ravan Dahan : रामकुंडावर 51 तर नाशिकरोडला 65 फूटी पुतळ्याचे रावणदहन

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : विजयादशमीनिमित्त रावणदहनाची परंपरा आहे. यंदा रामकुंडावर चतुः संप्रदाय आखाड्याच्या श्री व्यंकटेश बालाजी मंदिरातर्फे ५१ फुटी, तर नाशिक रोड येथे ६५ फुटी रावणाच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले जाणार आहे. दोन्ही ठिकाणांची तयारी पूर्ण झाली आहे.

चतुः संप्रदाय आखाड्याचे तत्कालीन महंत दीनबंधुदास महाराज यांनी १९६७ मध्ये प्रथम रामकुंड परिसरात रावणदहन सुरू केले. कोविड काळातील दोन वर्षे वगळता ही परंपरा अव्याहत सुरू आहे. गांधी तलावाजवळ यंदा रावणदहन होणार असून, त्यासाठी मूर्तिकार राजू आढाळकर यांनी ५१ फुटांच्या रावणाची प्रतिमा तयार केली आहे. त्यासाठी ३० गवताच्या गंज्या, ९५ मीटर कापड, ३० बांबू अशी सामग्री वापरण्यात आली आहे.

गांधीनगरलाही दहन

रामलीला समितीतर्फे गांधीनगर येथील मैदानावर ६५ फुटी रावणाची प्रतिमा तयार करण्यात आली आहे. गेल्या ६९ वर्षांपासून येथे विजयादशमीच्या संध्येला प्रभू श्रीरामाची वानरसेना आणि रावणाची राक्षससेना यांचे युद्धप्रसंग सादर केले जातात. रावण उभारणीचे काम पूर्ण केले जात असून, शनिवारी (दि. १२) सायंकाळी पारंपरिक वेशभूषेत कलाकार प्रसंग सादर करतील.

पंचवटीतून पारंपरिक मिरवणूक

रामकुंडावर होणाऱ्या रावणदहनाच्या अगोदर पंचवटी परिसरातून मिरवणूक निघणार आहे. त्यामध्ये राम, लक्ष्मण, हनुमान, विभीषण यांच्यासह वानरसेना आणि रावण यांच्या वेशभूषेतील कलाकार सहभागी होतील. नाग चौक, सीतागुंफा, काळाराम मंदिर, सरदार चौक, कपालेश्वर मंदिरमार्गे मिरवणूक रामकुंडावर पोहोचेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT