नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुगारवाडी येथील धबधब्यावर पावसाचा जोर वाढल्याने अडकून पडलेल्या ४० पर्यटकांची भोसला संस्थेचे विद्यार्थी, वनविभागाची रेस्क्यू टीम, स्थानिकांचे मदतीने सुखरूप सुटका करण्यात आली. सर्वचे सर्व ४० जण सुखरूप आहेत. प्रत्यक्षदर्शी आणि मुलांची सुटका करणारे डॉ. प्रमोद पवार यांनी घटनेचा थरार 'पुढारी' शी बोलताना कथन केला.
पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध त्र्यंबकेश्वरजवळील दुगारवाडी धबधब्याजवळ अचानक वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहात नाशिकचे सुमारे ४० पर्यटक अडकून पडले. रविवारी (दि. ६) डॉ. प्रमोद पवार हे काही विद्यार्थ्यांसह निसर्गदर्शनासाठी दुगारवाडी परिसरात गेले होते. वनविभागाने पूर्वसूचना देऊन धोकादायक ठिकाणी जाऊ नये, असे सांगितले होते, त्यामुळे हे सर्व जण दुरूनच धबधबा पाहून परतण्याच्या तयारीत होते. त्याचवेळी काही पर्यटक धबधब्याच्या पाण्यात अडकल्याचे त्यांना कळाले. यावेळी डॉ. पवार विद्यार्थ्यांना घेऊन घटनास्थळी गेले असता अनेक जण तीव्र प्रवाहातून स्वतः बाहेर पडण्यासाठी धोकादायक पद्धतीने धडपडत असताना त्यांना दिसले.
विद्यार्थ्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, यासाठी तत्काळ निर्णय घेत पाण्यात लाकडी ओंडके टाकून त्यांच्यासाठी सुरक्षित मार्ग तयार करण्याचे ठरवले. यश गायकवाड या विद्यार्थ्याने एका उंचावर असलेला मोठा ओंडका धाडसाने आणला, तर प्रथमेश भापकर याने रेस्क्यू टीमशी संपर्क करण्यासाठी जवळपास अर्धा तास पायी चढून मोबाइल रेंज मिळेल अशा ठिकाणी जाऊन संपर्क केला. त्यानंतर अर्धा तासाने वनविभागाचे अधिकारी आणि घटनास्थळी दाखल झाले. वनरक्षक कैलास महाले यांनी गांभीर्य लक्षात घेत ग्रामस्थांना पाचारण केले. यावेळी वनविभागाचे कर्मचारी, तसेच त्र्यंबक पोलिस स्टेशनचे कर्मचारी हेदेखली तिथे पोहोचले. वनविभागाचे अधिकारी, विद्यार्थी, ग्रामस्थ आणि यांनी अडकलेल्या पर्यटकांना सुखरूप बाहेर काढले. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी शेखर देवकर, वनपाल मधुकर चव्हाण, अरुण निंबेकर यांनी उपस्थित विद्यार्थी, ग्रामस्थ यांच्या मदतीने पर्यटकांनी सुटका केली.
भोसलाच्या विद्यार्थ्यांनी ओंडका पाण्यात टाकून पर्यटकांना आधार देत तीव्र प्रवाहातून बाहेर काढले. प्रवाहात वाहत असलेल्या एका मुलाला आम्ही ओढून काढले. बाहेर येऊन तो अक्षरश: थरथरत होता. भीतीमुळे त्याला जबर धक्का बसला हाेता. त्याच्या तोंडून शब्दही फुटत नव्हते. भोसला संस्थेचे विद्यार्थी केवळ अभ्यासातच नव्हे, तर संकटातही जबाबदारीने वागतात. याचा प्रत्यय घटनेच्या वेळी आला.डॉ. प्रमोद पवार, शिक्षक