

नाशिक : कोसळणाऱ्या पाऊसधारा, नदीला पूर तरीही आषाढी एकादशीच्या औचित्यावर रविवारी (दि. ६) नाशिकची धार्मिक आणि सांस्कृतिक ओळख असलेल्या गोदा आरतीचा उत्साह वाखाणण्याजोगा होता.
नाशिकची धार्मिक ओळख झालेली गोदा आरती अविरत, अखंड सुरूच असते. रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने गोदावरी मातेची नित्य महाआरती पावसाळ्यातही अखंड सुरू ठेवण्याची परंपरा भर पावसात पूर असतानाही नियमांचे पालन करून पाळली गेली.
मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला मोठा पूर आला असतानाही ११ समर्पित गोदासेवकांनी पुराच्या पाण्यात सुरक्षिततेसह उभे राहून महाआरती केली. महाआरतीत ६ युवती गोदासेविका व ५ युवक गोदासेवक सहभागी झाले होते. पुराच्या पाण्यात पाय रोवून, मुसळधार पावसात निथळत, खंड न पडू देता गोदामातेची पूजा व आरती करण्यात आली. खणा- नारळाने देवीची ओटी भरून महापूजा पूर्णत्वास नेण्यात आली. विशेष म्हणजे, प्रतिकूल हवामानातही अनेक भाविकांनी रेनकोट परिधान करून, छत्र्या घेत महाआरतीला उपस्थिती लावली. या सेवेमुळे स्थानिक भाविकांमध्येही समाधान व्यक्त होत आहे. पूरकाळातही अखंड नित्यपूजेची परंपरा पुढील पिढीपर्यंत चालू राहावी, हा समितीचा संकल्प अधोरेखित झाला.
नाशिक शहरात रविवारी (दि. ६) मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला हंगामातील पहिला मोठा पूर आला. १९ जूनपासून पूरपाणी प्रवाही आहे. त्यात गंगापूर धरणातून ५,१५४ क्यूसेकपर्यंत वाढवलेला विसर्ग आणि इतर नाल्यांच्या पुरामुळे नदीचा प्रवाह होळकर पुलाखाली १० हजारहून अधिक क्यूसेकवर गेला. त्यामुळे दुतोंड्या मारुतीच्या छातीला पाणी लागले आणि गोदाकाठ पाण्याखाली गेला.
रविवारची सुट्टी आणि आषाढी एकादशीमुळे भाविकांची रामकुंड परिसरात मोठी गर्दी झाली. साईबाबा मंदिरासमोरील भाजी पटांगणात पुरपाण्यात सेल्फीसाठी झालेल्या गर्दीमुळे सुरक्षा वाहनाला गस्त घालावी लागली. रामकुंडातील खोल्यांमध्ये दशक्रिया व अन्य धार्मिक विधी सुरू आहेत. साई मंदिरासमोरील मोफत भोजन व्यवस्था पुरातही सुरू असून गोरगरीबांना त्याचा लाभ मिळाला. पुराचे पाणी कपालेश्वर मंदिराजवळील पाणपोईपर्यंत पोहोचले असून वस्त्रांतरगृह आणि अर्धनारीनटेश्वर मंदिर पाण्याने वेढले गेले आहे.
पावसाचा जोर वाढलेला असताना सायंकाळी 5 ते 7 दरम्यान पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुलावर नाशिककरांनी पूर पाहण्यासाठी गर्दी केली. वाहने पुलाजवळ पार्क केल्यामुळे मोठी वाहतूककोंडी झाली. पोलिसांनी नागरिकांना सतत हटवण्याचे प्रयत्न केले. सायंकाळी 7 नंतर रविवार कारंजा परिसरातही तीव्र वाहतूककोंडी झाली.
वस्त्रांतर गृहाजवळ पाणी पोहोचल्याने अर्धनारीनटेश्वर मंदिर पुराच्या पाण्यात बुडाले आहे. रामतीर्थावरील पाणपोईपर्यंत पाणी आले आहे. पुरामुळे भाजी पटांगणातील टपर्या भांडीबाजारात हलवण्यात आल्या. काळे स्टील भांडारपर्यंत टपर्यांची रांग लागली होती. पुराचे पाणी बाजारात शिरल्याने काही दुकानांतही पाणी घुसले. दुकानदारांनी दिवसभर सामान हलवण्याचे काम केले. पुढील चार दिवस जोरदार पावसाचा इशारा दिला असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.