नाशिक/सातपूर : पुढारी वृत्तसेवा
पती-पत्नीमधील भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या आईचा तिच्याच मद्यपी मुलाने कुऱ्हाडीचा घाव डोक्यात घालून खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. १५) मध्यरात्री हनुमाननगर, कॅनॉल रोड परिसरात घडली. कमलाबाई आनाजी वळवी (६५) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी त्यांचा मुलगा तानाजी आनाजी वळवी (४०, रा. हनुमाननगर, कॅनॉल रोड, नाशिक) याला गंगापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी मध्यरात्री घरात पती-पत्नीसोबत वाद सुरू असल्याने हा वाद सोडविण्यासाठी कमलाबाई वळवी गेल्या होत्या. यावेळी मुलगा तानाजी याचा राग अनावर झाल्याने त्याने आईवर कुऱ्हाडीने हल्ला केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
या हल्ल्यात कमलाबाई गंभीर जखमी झाल्या. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. तानाजी वळवी याला दारूचे व्यसन असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, त्याने नेमक्या कोणत्या कारणातून आईवर हल्ला केला, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक पूनम पाटील आणि पोलीस उपनिरीक्षक संदीप निकम यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तानाजी वळवी याला ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू केली आहे.
गंगापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, जन्मदात्या आईचाच मुलाने खून केल्याच्या घटनेने हनुमाननगर परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अधिक तपास गंगापूर पोलीस करीत आहेत.