Maharashtra Rainfall Deficit Pudhari
नाशिक

Rainfall Deficit Nashik | पावसाची पाठ, दहा तालुके दुष्काळात!

Rainfall Deficit Nashik | जिल्ह्यात केवळ ६९.८ टक्के पाऊस : इगतपुरीत सर्वाधिक ५८.६ टक्के तूट

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात पावसाने यंदा विचित्र स्वरूप धारण केले असून, जुलै महिन्यात काही भागांत अतिवृष्टी झाली, तर बहुतांश भागांत दीर्घ पावसाचा खंड आणि पावसाची तूट अशा दुहेरी संकटाला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले. नंतरच्या काळात अतिवृष्टी झालेल्या भागातही पावसाने पाठ फिरवली.

या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सिन्नर, येवला, नांदगाव, मालेगाव, बागलाण, इगतपुरी, सुरगाणा, पेठ, कळवण आणि देवळा या १० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. त्यामुळे खरीप पिकांच्या नुकसानीनंतर आता शेतकऱ्यांना शासनाच्या दुष्काळी उपाययोजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात पावसाचे वितरण अत्यंत असमान राहिले. सप्टेंबरअखेरच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यामध्ये सरासरीच्या तुलनेत केवळ ६९.८ टक्के पाऊस झाला. म्हणजेच सरासरीच्या तुलनेत तब्बल ३०.२ टक्के पावसाची तूट आहे. तालुकानिहाय पाहता येवला येथे केवळ ५२.९ टक्के, नांदगाव ५७.५ टक्के, मालेगाव ५१.६ टक्के, पेठ ६६.९ टक्के आणि सिन्नरमध्ये ७५ टक्के पाऊस झाला. देवळ्यात ७९.२, सुरगाण्यात ८१.३, बागलाणमध्ये ९१.१, तर कळवणमध्ये ८८.७ टक्के पावसाची नोंद झाली, तर इगतपुरीत सरासरीच्या तुलनेत केवळ ४१.४ टक्के पाऊस नोंदविला गेला आहे.

या आकडेवारीवरून इगतपुरीत तब्बल ५८.६ टक्के, येवल्यात ४७.१, नांदगावमध्ये ४२.५ आणि मालेगावमध्ये ४८.४ टक्के पावसाची तूट असल्याचे स्पष्ट होते. पेठमध्ये ३३.१, सिन्नरमध्ये २५, देवळ्यात २०.८, सुरगाण्यात १८.७, कळवणमध्ये ११.३ आणि बागलाणमध्ये ८.९ टक्के तूट आहे. त्यामुळे एकूण पावसाचे प्रमाण कमी असतानाच पावसाच्या वेळेतील आणि वितरणातील मोठ्या तफावतीमुळे शेतीचे गणित बिघडले आहे.

विशेष म्हणजे, जुलै महिन्यात जिल्ह्यातील काही भागांत पावसाने जोरदार हजेरी लावून, अतिवृष्टीसदृश परिस्थिती निर्माण केली होती; मात्र त्यानंतर अनेक दिवस पावसाने दडी मारली. नांदगाव, मालेगाव, येवला, देवळासह काही तालुक्यांमध्ये ३० दिवसांहून अधिक काळ पावसाचा खंड नोंदविला. या पावसाच्या खंडामुळे मका, बाजरी, सोयाबीन, कापूस तसेच खरीपातील कांदा पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. सुरुवातीला पिकांना मिळालेला ओलावा नंतरच्या काळात कमी पडला.

सप्टेंबरमध्येही पावसात अपेक्षित सातत्य न राहिल्याने पिके उत्पादनाच्या टप्प्यावर असताना, पाण्याअभावी करपण्याची परिस्थिती निर्माण झाली. परिणामी, पावसाचे एकूण प्रमाण, पावसाचा खंड, पिकांची स्थिती आणि पाणीसाठ्याची उपलब्धता या सर्व बाबी दुष्काळी स्थितीच्या निर्णयात महत्त्वाच्या ठरल्या आहेत.

दरम्यान, जिल्ह्यातील काही तालुक्यांत पावसामुळे नुकसान झाले असले, तरी नंतरच्या दीर्घ खंडामुळे त्याच भागात पिकांवर पाण्याची कमतरता निर्माण झाली, त्यामुळे 'कधी अतिवृष्टी, तर कधी पावसाची तूट' अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे.

दृष्टीक्षेपात पाऊस

● जिल्ह्यात पावसाची तूट - ३०.२ टक्के
● सप्टेंबरअखेर सरासरीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण - ६९.८ टक्के
● इगतपुरीत सर्वाधिक तूट - ५८.६ टक्के
● येवला - ४७.१ टक्के
● नांदगाव - ४२.५ टक्के
● मालेगाव - ४८.४ टक्के

आता मदतीची प्रतीक्षा

दुष्काळ जाहीर झाल्याने संबंधित तालुक्यांतील शेतकऱ्यांना शासनाच्या दुष्काळी उपाययोजनांचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. पीक नुकसान, पाणीटंचाई, चारा उपलब्धता, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि आगामी रब्बी हंगामाचे नियोजन या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून कोणत्या उपाययोजना केल्या जातात, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

चांदवडला वगळले?

राज्य सरकारने नाशिक जिल्ह्यातील १० तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे. मात्र, यात चांदवड तालुक्याला वगळले असून, येथील शेतकऱ्यांनी सरकारच्या या निर्णयाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. बागलाणमध्ये सप्टेंबरअखेर सुमारे ९१.१ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

तसेच ८८.७ टक्के पावसाची नोंद झालेला कळवण तालुकाही दुष्काळग्रस्त ठरविलेला असताना, चांदवड तालुक्यात याच प्रमाणात म्हणजे ८९.१ टक्के पाऊस झाला असतानाही, चांदवडला दुष्काळाच्या निकषांमधून का वगळले, असा प्रश्न येथील शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. आता दुष्काळ जाहीर झालेल्या १० तालुक्यांतील शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या सवलती, पीक नुकसानभरपाई, पाणीपुरवठा व अन्य उपाययोजनांकडे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT