नाशिक : लहानपणापासून वाचनाची आवड असल्याने आयुष्याच्या वळणावर ज्या ठिकाणी जात तेथील ग्रंथालयातून आवडीची पुस्तकांची पारायणे होत असत. या वाचनातूनच मला थोर व्यक्तिमत्वांची ओळख झाली. त्यातून व्यक्तिमत्वाची जडणघडण होत गेली, असे प्रतिपादन अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा व लोक साहित्याच्या अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांनी केले.
कै. मु. शं. औरंगाबादकर सभागृहात सार्वजनिक वाचनालयाच्या ग्रंथालय महोत्सवाचा प्रारंभ डॉ. तारा भवाळकर यांच्या मुलाखतीने झाला. पत्रकार फणींद्र मंडलिक यांनी त्यांची मुलाखत घेतली. यावेळी डॉ. भवाळकर यांनी नाशिक, सांगली, कल्याण येथे लहानपणी जपलेल्या आठवणी सांगताना तेथील वाचनालये, तेथील माणसांच्या संग्रहामुळे लिखाण करताना मदत झाल्याचे सांगितले. सात-आठ वर्षाची असल्यापासूनच वाचनाची आवड लागली. पुस्तके विकत घेण्याची ऐपत नसताना दुसऱ्यांकडून पुस्तके घेऊन वाचनाचा छंद जपला.
ज्या शाळेत मी गेले तेथे सुदैवाने चांगले शिक्षक मिळाले. त्यांच्याकडून ग्रंथवाचनासह आयुष्याकडे बघण्याची शिकवण मिळाली. नाशिकमध्ये डॉ. बा. वा. दातार, विठूबापू आंबेकर, सोहोनी यासारखे शिक्षक लाभले. कुसुमाग्रजांचाही स्नेह मिळाला. ग्रंथालयानेच समृद्ध केले. व्यक्तिमत्वाची जडणघडण झाली. प्रास्ताविक देवदत्त जोशी यांनी केले. सावाना अध्यक्ष प्रा. दिलीप फडके यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सुरेश गायधनी यांनी आभार प्रशांत जुन्नरे यांनी मानले. आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड उपस्थित होत्या.
विविध राज्यातील लोककलांची ओळख
उन्हाळ्यात व दिवाळीत सुटी मिळत. त्यामुळे लोकसाहित्य, लोककथा, लोकनाट्याचा अभ्यास करण्यासाठी भ्रमंती केली. कोकणातील दशावतार, कर्नाटकातील यक्षगान, तेलंगणा, केरळमधील लोककलांचा अभ्यास नाटकांच्या प्रेमातून केला. लोककलेआधी माझे नाटकावर प्रेम होते. यातूनच मी राज्यातीलच नव्हे तर देशातील ग्रंथालये धुंडाळत अभ्यास केला. तेलंगणात भोसले घराण्यातील सरदारांनी लिहिलेली नाटके वाचण्याचे भाग्य मिळाले. याठिकाणी ताडपत्रावर लिहिलेल्या लिखाणाची ओळख झाली.