Arrested Pudhari
नाशिक

Ayurveda Doctor Death| प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. मनीषा जेजूरकर यांची आत्महत्या; पती नीलेश जेजूरकरविरुद्ध गुन्हा दाखल

Ayurveda Doctor Death| येथील प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. मनीषा जेजूरकर यांनी केलेल्या आत्महत्येप्रकरणी पती दत्तात्रय नीलेश जेजूरकर (४६) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

येथील प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. मनीषा जेजूरकर यांनी केलेल्या आत्महत्येप्रकरणी पती दत्तात्रय नीलेश जेजूरकर (४६) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी डॉ. जेजूरकर फरार आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शुक्रवारी (दि. ६) डॉ. मनीषा जेजूरकर यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

त्यांनी पतीमुळे आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या माहेरच्यांनी केला होता. या प्रकरणी रोहिणी वैभव थोरात (३५) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शुक्रवारी (दि. ६) त्यांची बहीण मनीषाने आत्महत्या केली असून, ती बेशुद्ध असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्या त्वरित बहिणीच्या घरी दाखल होत त्यांनी, भाऊ गौरव आणि पती नीलेश यांनी तिला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले.

तेथे डॉक्टरांनी तपासून डॉ. मनीषा जेजूरकर यांना मृत घोषित केले. फिर्यादी रोहिणी थोरात यांनी विविध आरोप केले आहेत. मनीषा या जेल रोड येथून गंगापूर रोड येथे २०२१ पासून राहण्यास आल्या होत्या. तेव्हापासून पती नीलेश हा जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरसमवेत जवळीक साधून तिला घरातील सर्व बारीकसारीक गोष्टी सांगत होता.

ती म्हणेल तसा तो घरात वागून मनीषाकडे दुर्लक्ष करून तिला मानसिक त्रास देत होता. नीलेशच्या या वागणुकीमुळे डॉ. मनीषा या मानसिकदृष्ट्या खचल्या होत्या. नीलेशने डॉ. मनीषा यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले, असे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

याचबरोबर डॉ. मनीषा यांच्या भावाकडून डॉ. नीलेश जेजूरकरपासून आमच्या बहिणीचा मानसिक छळ सुरू होता, असा आरोप फिर्यादीत केलेला आहे. याप्रकरणी नीलेश जेजूरकरविरुद्ध गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलिस निरीक्षक हर्षल अहिरराव अधिक तपास करीत आहेत.

शासकीय डॉक्टरांकडून दबावाचा प्रयत्न

गुन्हा दाखल होऊ नये म्हणून काही विशिष्ट डॉक्टर तसेच जिल्हा रुग्णालयातील अधिकारी यांनी यामध्ये मध्यस्थी व दबाव आणण्याचा प्रयत्न केला.

मात्र, डॉ. मनीषा जेजुरकर यांचे कुटुंबीय दुपारपासून ते रात्री उशिरापर्यंत गंगापूर पोलिस ठाण्यामध्ये ठाण मांडून होते. अखेर कुटुंबीयांच्या पाठपुराव्यानंतर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT