नाशिक : पुढारी वृत्तसेवा
डॉ. मनीषा जेजूरकर मृत्यू प्रकरणात संशयित डॉ. नीलेश जेजूरकर आणि डॉ. स्वाती चव्हाण यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्याने दोघांचीही रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. पोलिस कोठडीची मागणी राखीव ठेवून संशयितांना न्यायालयीन कोठडी मिळावी, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांकडून करण्यात आली.
त्यानंतर न्यायालयाने कोठडी मान्य केली. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस आयुक्त तथा तपास अधिकारी प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, तपासातील काही महत्त्वाचे फॉरेन्सिक अहवाल अद्याप प्राप्त होणे बाकी आहे.
डॉ. मनीषा जेजूरकर यांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून विविध बाजूंनी तपास करण्यात येत आहे. तपासादरम्यान उपलब्ध झालेल्या पुराव्यांची तसेच संबंधित बाबींची फॉरेन्सिक तपासणी करण्यात येत आहे. या तपासातून प्राप्त होणाऱ्या माहितीच्या आधारे पुढील तपासाची दिशा निश्चित होणार आहे.
दरम्यान, संशयित डॉ. नीलेश जेजूरकर आणि डॉ. स्वाती चव्हाण यांची पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. तपास अधिकारी सहाय्यक पोलिस आयुक्त प्रमोद वाघ यांनी न्यायालयासमोर तपासाची सद्यस्थिती मांडत संशयितांना न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी केली.
त्यानुसार न्यायालयाने दोन्ही संशयितांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर त्यांची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. या प्रकरणातील काही फॉरेन्सिक तपासण्या अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत.
संबंधित नमुने आणि डिजिटल अथवा अन्य पुराव्यांचा तपास फॉरेन्सिक विभागाकडून करण्यात येत आहे. या तपासातून नेमकी कोणती माहिती समोर येते, याकडे पोलिसांचे लक्ष आहे. फॉरेन्सिक विभागाकडून अहवाल प्राप्त होण्यासाठी काही कालावधी लागण्याची शक्यता आहे.
दरम्यान, संशयितांना दीर्घकाळ पोलिस कोठडीत ठेवणे शक्य नसल्याने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. फॉरेन्सिक अहवाल प्राप्त झाल्यानंतर तपास पुढे नेला जाणार आहे.