नाशिक : दैनिक पुढारी आणि निफाड तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित कै. बी. पी पाटील ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षा- २०२५ चे आयोजन डिसेंबर आणि जानेवारी २०२६ मध्ये करण्यात आले आहे. मागील वर्षापासून ही परीक्षा अधिक व्यापक स्वरूपात घेण्यात येत असून या परीक्षेचे दोन टप्पे करण्यात आलेले आहेत. प्रथम टप्पात ही परीक्षा तालुकास्तरावर वेगवेगळ्या २३ केंद्रांवर रविवारी (दि.२१) घेण्यात आली.
सिन्नर, राहता, संगमनेर, अकोले, आळेफाटा, मनमाड, या केंद्रांवर परिक्षेचा पहिला टप्पा संपन्न झाला. दुसरा टप्पा म्हणजेच जिल्हास्तरावर ही परीक्षा ४ जानेवारी २०२६ रोजी पिंपळगाव हायस्कूल, पिंपळगाव बसवंत, तालुका निफाड, जिल्हा नाशिक येथे आयोजित करण्यात आलेली आहे. ही परीक्षा इयत्ता दहावीच्या गटासाठी आयोजित करण्यात आली असून, ही परीक्षा शंभर गुणांची बहुपर्यायी परीक्षा घेण्यात आली.
वरील पाचही केंद्रांपैकी सिन्नर या केंद्रावर १००४ विद्यार्थी, राहता केंद्रावर ४८६ विद्यार्थी, संगमनेर केंद्रावरती ४६५ विद्यार्थी, अकोले केंद्रावर केंद्रावर ५३० विद्यार्थी, आळेफाटा केंद्रावर ३९० विद्यार्थी विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षा ही विद्यार्थ्यांसाठी एक जिज्ञासा जागृत करणारी परीक्षा आहे. कारण या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांचा जो अभ्यासक्रम आहे तो दहावी पर्यंतचा असून अत्यंत बारकाईने या अभ्यासक्रमावर प्रश्न विचारलेले असतात. यातून विद्यार्थ्यांच्या सूक्ष्म निरीक्षण शक्तीही वृद्धिंगत होण्यास मदत होते. ग्रामीण भागातील विद्यार्थी हा आजच्या स्पर्धेच्या युगात मागे राहू नये, तसेच त्यांच्यातील न्यूनगंड कमी व्हावा हा महत्त्वाचा उद्देश ही परिक्षा घेतली जाते. या परीक्षेचा कालावधी हा दोन तासांचा असून दुपारी ११ ते १ या वेळेमध्ये परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांसाठी लकी ड्रॉ चे ही आयोजन करण्यात आले. लकी ड्रॉ मध्ये विद्यार्थ्यांना प्रामुख्याने स्मार्ट वॉच, टिफिन सेट आणि स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले. तसेच तालुकास्तरावर प्रथम पाच विद्यार्थ्यांसाठी भरघोस अशा स्कॉलरशिपचे ही आयोजन करण्यात आलेले आहे.
करिअर संधी बाबतीत मार्गदर्शन
लकी ड्रॉचे बक्षीस वाटपानंतर उपस्थित विद्यार्थ्यांना कॉलेजचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश अनारसे यांनी विद्यार्थ्यांसाठी पुढील करिअर संधी बाबतीत योग्य असे मार्गदर्शन केले. तसेच आपल्या मनोगता मधून त्यांनी स्पर्धा परीक्षेचे महत्त्व, वेळेचे महत्त्व डॉक्टर अब्दुल कलाम यांचे जीवन, विचारांचे महत्त्व आपल्या भाषणातून पटवून दिले.