नाशिक : पुढारी वृत्तसेवा
परिसरातील अलीकडील भूकंपीय हालचालींच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित बांधकामाबाबत जनजागृती करण्यासाठी 'आयफेस' अर्थात इंडियन फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ सिव्हिल इंजिनिअर्सतर्फे 'भूकंप : जोखमीपासून सुरक्षिततेकडे' या विषयावर विशेष तांत्रिक चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. पाथर्डी फाटा येथील रॅडिसन ब्ल्यू येथे झालेल्या या कार्यक्रमामध्ये भूकंपाची भीती न बाळगता सुरक्षित बांधकामासाठी आवश्यक उपाययोजनांची तयारी करण्याचा संदेश देण्यात आला.
भूकंप अभियांत्रिकी विषयातील पीएच.डी. डॉ. अभियंता संदीप शिरखेडकर यांनी नाशिकची भूकंपीय परिस्थिती, भूकंपरोधक बांधकाम, संरचनात्मक रचना, भारतीय मानके आणि सुरक्षित बांधकाम पद्धती याबाबत मार्गदर्शन केले.
बांधकाम क्षेत्रातील विविध व्यावसायिकांची जबाबदारी तसेच प्रकल्पांमध्ये अनिवार्यपणे पाळावयाच्या बांधकाम पद्धती यावरही त्यांनी सविस्तर माहिती दिली. भूकंपरोधक बांधकाम करताना भारतीय मानकांचे काटेकोर पालन करण्याचे महत्त्वही स्पष्ट करण्यात आले.
कार्यक्रमास आयफेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अभियंता विजय सानप, पश्चिम विभागाचे उपाध्यक्ष अभियंता अनिल कडभाने, राष्ट्रीय पीएमओ अभियंता आशिष महाले, नाशिकचे अध्यक्ष अभियंता रवींद्र धनाईत, उपाध्यक्ष अभियंता ज्ञानेश्वर गोडसे व अभियंता महेंद्र शिरसाट, सचिव अभियंता अमित सानप, सहसचिव अभियंता लीलाधर जावळे व अभियंता नीलेश भाटी तसेच कोषाध्यक्ष अभियंता मेघल पवार आदी उपस्थित होते.