ठळक मुद्दे
दीपोत्सव पर्यावरणस्नेही कंदील लावत साजरा करणाऱ्यांच्या प्रमाणात वाढ
आकाशकंदिलांचे दर १० ते १५ टक्क्यांनी वाढले
आकाशकंदीलासाठी कागद, कापड किंवा पुनर्वापर करता येणाऱ्या नैसर्गिक वस्तूंचा वापर
नाशिक : आदित्य देशमुख
दिवाळीनिमित्त बाजारपेठेत आकर्षक आकाश कंदीलांची रेलचेल असते. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकचा वापर होत असल्याने पर्यावरणाच्या हानिचा प्रश्न निर्माण होत आहे. परिणामी, दीपोत्सव पर्यावरणस्नेही कंदील लावत साजरा करणाऱ्यांच्या प्रमाणात वाढ होत असून आश्वासक चित्र बाजारपेठेत दिसत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंंदा आकाशकंदिलांचे दर १० ते १५ टक्क्यांनी वाढले असल्याची माहितीही व्यापाऱ्यांनी दिली.
प्लास्टिकचे विघटन होत नसल्याने प्रदूषणात वाढ होऊन पर्यावरणास हानी पोहोचते. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्यासाठी पर्यावरणप्रेमींकडून जागृती केली जात आहे. त्याला नाशिककरांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. कागद, कापड किंवा पुनर्वापर करता येणाऱ्या नैसर्गिक वस्तूंसह, आकाश कंदिलांनी बाजारपेठत जागृतीचा 'प्रकाश' पडत आहे. पर्यावरणाचे रक्षण आणि कलात्मक सौंदर्य यांचा मिलाफ असलेल्या पर्यावरणपूरक कंदिलांना नागरिक पसंती देत आहे.
निलेश हिरे पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचा संकल्प करत प्लास्टिक वापराशिवाय केवळ पर्यावरणस्नेही कंदीलांची निर्मिती करतात. त्यासाठी पुठ्ठा, रंगीबेरंगी कापड यांचा वापर केला जातो. त्यांच्या पर्यावरणस्नेही आणि कलात्मक कंदिलांना ग्राहकांचाही प्रतिसाद मिळत गेला. पर्यावरणस्नेही उत्सव साजरा करण्याच्या त्यांच्या या कामात त्यांचे आई-वडील, भाऊ आणि वहिनी हेही जोडले गेले असून पहिल्या वर्षीपासून त्यांच्या कंदिलांवर ग्राहकांनी पसंतीची मोहर उमटवली आहे.
ज्युट, रेशमी कापड, खणाचे काठाचे कापड, पैठणीचे कापड, बांबू, कागद, लाकूड, वेत आदी पर्यावरण पूरक आकाशकंदिलांचे अनेक पर्याय बाजारपेठेत उपलब्ध आहेत. त्यांच्या किमतीत गतवर्षीच्या तुलनेत १० टक्क्यांनी वाढ झाली आहे.प्रांजल देव, विक्रते, एम. जी. रोड.
४०० रुपयांपासून विस्तृत श्रेणी
प्लास्टिक कंदिलांच्या किंमती १०० रुपयांपासून उपलब्ध आहेत. मात्र, वाढलेल्या जागृतीमुळे पर्यावरणपूरक कंदिलांना नागरिक पसंती देताना दिसत आहेत. कागद, बांबू व पुनर्वापर करता येणाऱ्या साहित्यापासून निर्मित कंदिल साधारणत: ४०० रुपयांपासून ते २ हजारांपर्यंत उपलब्ध आहेत. नानाविध आकार, रंग, सर्जनशील संकल्पना आणि दिवे लावल्यानंतर त्यात पडणाऱ्या वैशिष्टपूर्ण रचनेमुळे यंदा कंदिलांचे बरेच पर्याय उपलब्ध झाले आहे.