नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मतदारयादी सखोल पुनरीक्षण कार्यक्रम अधिक गतिमान करून यादी अचूक, अद्ययावत व पारदर्शी करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी मतदान केंद्रनिहाय बीएलए (बूथ लेव्हल एजंट) नियुक्त करावेत, असे आवाहन विभागीय आयुक्त तथा मतदारयादी निरीक्षक डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिले.
त्याचप्रमाणे पुनरीक्षण कामात जाणीवपूर्वक दिरंगाई किंवा निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्याच्या सूचना करतानाच मतदान केंद्रांची रचना मतदारस्नेही करण्याचे निर्देशही डॉ. गेडाम यांनी अधिकाऱ्यांना दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये डॉ. गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली मतदारयादीचा आढावा व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी आमदार सीमा हिरे, नितीन पवार, हिरामन खोसकर, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अपर आयुक्त अरविंद लोखंडे, मनपा अतिरिक्त आयुक्त अमित रंजन, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मधुमती सरदेसाई यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांचे निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.
यावेळी डॉ. गेडाम यांनी सांगितले की, मतदारयादीतील प्रत्येक नोंद काळजीपूर्वक तपासावी. एकाच मतदाराची दोन ठिकाणी नोंद, स्थलांतर, मृत्यू किंवा अन्य कारणांमुळे बदल आवश्यक असलेल्या नोंदींची नियमानुसार पडताळणी करावी. कोणत्याही पात्र मतदाराचे नाव चुकीने वगळले जाणार नाही, याची दक्षता घ्यावी.
नाव वगळण्यापूर्वी वस्तुनिष्ठ पडताळणी करून आवश्यकतेनुसार संबंधित मतदाराला नोटीस देऊन म्हणणे मांडण्याची संधी द्यावी. दावे-हरकतींचीही काटेकोर छाननी करावी अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत ४० लाख ७६ हजार ६६६ मतदारांचे फॉर्म भरून घेण्यात आले असून, १० लाख २७ हजार ८९२ मतदारांचे फॉर्म 'अनकलेक्टेबल' असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. विशेषतः शहरी भागातील 'अनकलेक्टेबल' नोंदींची योग्य तपासणी करून आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सादरीकरणाद्वारे पुनरीक्षण कार्यक्रमाची सद्यःस्थिती व प्रगतीची माहिती दिली. राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनीही मतदारयादी अधिक अचूक व पारदर्शक करण्यासाठी विविध सूचना मांडल्या. मतदारयादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम-२०२६ अंतर्गत मतदारयादी अधिक अचूक व अद्ययावत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे.
या मोहिमेंतर्गत दि. १९, २०, २६ आणि २७ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील निश्चित मतदान केंद्रांवर सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत विशेष मतदार नोंदणी शिबिरे घेण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे ज्या मतदारांचे प्रारूप यादीत काही कारणांमुळे नाव येऊ शकलेले नाही, असे मतदारही या शिबीरांच्या माध्यमातून त्यांच्या हरकती व दावे दाखल करू शकणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त तथा मतदारयादी निरीक्षक डॉ. गेडाम यांनी दिली.
राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमवेत झालेल्या बैठकीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी (दि. १०) विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी एसआयआर संदर्भात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सांगितले की, एसआयआर अंतर्गत तयार करण्यात आलेली प्रारूप मतदारयादी दि. ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून, ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर या कालावधीत नागरिकांना दावे व हरकती दाखल करता येणार आहेत.
आगामी काळात मतदान केंद्रांची रचना करताना ठिकाण, मतदारसंख्या आणि उपलब्ध सुविधांचा विचार करावा. मतदान केंद्र मतदारांना सहज उपलब्ध होईल आणि तिथे कोणतीही अडचण येणार नाही, याला प्राधान्य द्यावे, असे डॉ. गेडाम यांनी सांगितले. क्षेत्रीय पातळीवर काम करणाऱ्या बीएलओंच्या कामाचा नियमित आढावा घेऊन आवश्यक सूचना द्याव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दि. १ ऑक्टोबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या तरुण-तरुणींना मतदार म्हणून नोंदणी करता येणार आहे. त्यासाठी नमुना ६ भरावा लागणार आहे. मतदारयादीतील नाव, पत्ता किंवा अन्य तपशीलात दुरुस्ती करण्यासाठी नमुना ८, तर नावाबाबत हरकत अथवा वगळण्याच्या प्रक्रियेसाठी नमुना ७ वापरता येणार आहे. हे अर्ज ऑनलाइनही भरता येणार आहेत. या विशेष शिबिरांमध्ये नागरिकांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात बीएलओ यांच्याकडून आवश्यक मार्गदर्शन मिळणार आहे.