Godavari Flood : विसर्ग घटवला, गोदावरीची पूरस्थिती कायम, 'गंगापूर'मधून दोन हजार क्यूसेकने विसर्ग  File Photo
नाशिक

Godavari Flood : विसर्ग घटवला, गोदावरीची पूरस्थिती कायम, 'गंगापूर'मधून दोन हजार क्यूसेकने विसर्ग

धरण परिसरात दमदार पाऊस होत असल्याने, जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणे काठोकाठ भरली आहेत.

पुढारी वृत्तसेवा

Discharge reduced, Godavari flood situation continues, discharge of two thousand cusecs from 'Gangapur'

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गंगापूर धरण व परिसरात परतीच्या पावसाने थैमान घातल्याने, मंगळवारी गंगापूर धरणातून टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढविण्यात आला. त्यामुळे गोदावरीला या मोसमातील पाचवा मोठा पूर गेला. बुधवारी (दि. २४) पावसाने काहीशी उघडीप घेतल्याने विसर्ग सहा हजार क्यूसेकवरुन २,०४० क्यूसेकपर्यंत मर्यादीत करण्यात आला. तरी गोदापात्रातील पूरस्थिती कायम आहे.

मागील काही दिवसांपासून परतीचा पाऊस धो-धो बरसत आहे. विशेषतः धरण परिसरात दमदार पाऊस होत असल्याने, जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणे काठोकाठ भरली आहेत. जिल्ह्यातील २६ धरणांपैकी वाघाड, वाकी, भोजापूर, पुनद, माणिकपुंज हे धरण प्रकल्पांचा अपवाद वगळता इतर सर्वच धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे.

मंगळवारी गंगापूर धरण समूहातून सहा हजारहून अधिक क्यूसेक वेगाने विसर्ग होत होतो. याशिवाय पालखेड धरण समूहातून २५ हजार ११५ क्यूसेक आणि गिरणा खोरे धरण समूहातून २४ हजार ७३१ क्यूसेक असा एकूण ६९ हजार ८१९ क्यूसेक वेगाने विसर्ग झाला. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच नदी, नाले तुडूंब भरून वाहत आहेत. गोदावरीला मोसमातील पाचवा पूर आला असून, अनेक मंदिरे पाण्याखाली गेली आहेत.

दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत लागलेले पाणी विसर्ग घटवताच बुधवारी (दि. २४) कमी झाले. धरण परिसरात पावसाचा जोर वाढल्यास पुन्हा विसर्ग वाढविला जाण्याची शक्यता आहे. अशात नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. परतीचा पाऊस १५ ऑक्टोबरपर्यंत बरसण्याचा अंदाज यापूर्वीच हवामान विभागाने वर्तविल्याने, पूरस्थिती आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे.

सर्वच धरणे काठोकाठ

जिल्ह्यातील सर्व लहान-मोठे २६ धरण प्रकल्प काठोकाठ भरली आहेत. जिल्ह्यातील धरण समूहात सद्यस्थितीत ९९ टक्के जलसाठा आहे. याशिवाय पाण्याचा विसर्गही मोठ्या प्रमाणात केला जात असल्याने, जायकवाडी धरणातदेखील मोठ्या प्रमाणात पाणी पोहोचले आहे. जायकवाडी धरण काठोकाठ भरल्याने, त्यातून मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जात असल्याने, मराठवाड्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT