Digital Ashadhi Wari 
नाशिक

Digital Ashadhi Wari | तरुण पिढीची डिजिटल आषाढी ; सोशल मीडियावर गाजतेय वारी

Digital Ashadhi Wari | तरुण पिढीची डिजिटल आषाढी ; सोशल मीडियावर गाजतेय वारी

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : अंजली राऊत

पंढरपूरवारीसाठी नाशिक-त्र्यंबकेश्वरमधून गेलेले काही तरुण कीर्तनकार आणि वारकरी सोशल मीडियाच्या माध्यमातून वारीची परंपरा घराघरांपर्यंत पोहोचवत आहेत. त्यामुळे पारंपरिक टाळ-मृदंगाच्या गजरासोबतच आता इन्स्टाग्राम रील्स, यू-ट्यूब आणि फेसबुक लाइव्हद्वारे वारीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यातील प्रसिद्ध कीर्तनकार सोपान महाराज कानेरकर, ज्ञानेश्वर महाराज सानप, राहुल भास्कर घोडके यासारख्या अनेक तरुण कीर्तनकार या वारीत सहभागी झाले असून, त्यांच्या माध्यमातून तसेच नाशिकमधील तरुण मंडळीकडून डिजिटल माध्यमातून वारीचे अनेक पैलू उलगडले जात आहेत. केवळ मंदिरापुरते मर्यादित न राहता ही मंडळी आपल्या कीर्तनातील प्रबोधनात्मक व्हिडिओ, रील्स प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवित आहेत.

विशेष म्हणजे चालू घडामोडींवर संतांच्या अभंगांचा दाखला देत तयार केलेले रील्स लाखो तरुणांच्या पसंतीस उतरत आहेत. या मंडळींकडून ऐतिहासिक काळाराम मंदिर आणि गोदाकाठावरील सुंदरनारायण मंदिरात आषाढीनिमित्त होणारी पूजा, कीर्तन आणि भजनांचे थेट प्रक्षेपण केले जात आहे.

आम्ही ५० जण वारीत सहभागी झालो आहोत. वारीत प्रबोधनपर नाट्य सादर करत विठ्ठल, नामदेव आणि तुकारामांचे विचार समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. आमच्या सोबत आफ्रिका, मॉरिशियस येथूनदेखील वारीमध्ये सहभागी झाले आहेत.

'लाइक्स' नव्हे तर संस्कारांची वारी

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सचे वारी आणि अभंगांचे रील्स यातून तरुण वारकऱ्यांना लाखो व्ह्यूज मिळत आहेत. आयटी इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंटचे शिक्षण घेतलेली तरुणाई देखील कीर्तनात आनंदाने सहभाग नोंदवत आघाडीवर आहे. तरुणांकडून व्यसनमुक्ती, पर्यावरण आणि स्त्रीभ्रूण हत्या यांसारख्या गंभीर विषयांवर रील्सद्वारे सोप्या भाषेत भाष्य केले जात असल्याने वारीतून जनजागृती होत आहे. थेट पंढरपूर गाठू न शकणाऱ्या वृद्धांसाठी मंदिरातील सोहळ्याचे फेसबुक आणि यू-ट्यूबवर तरुणाईकडून थेट प्रक्षेपण केले जात असल्याने कुटुंबातील घटकांना मनोभावे दर्शन होत आहे.

संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या विचारांचा वारसा आजची तरुणाई समर्थपणे जपत आहे. सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करत ही तरुण पिढी संतविचारांचे प्रबोधन करत आहे. संतपरंपरेतील विचार आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुंदर संगम यंदा वारीत अनुभवायला मिळत आहे.

- सोपान महाराज कानेरकर, कीर्तनकार, नाशिक

आम्ही ५० जण वारीत सहभागी झालो आहोत. वारीत प्रबोधनपर नाट्य सादर करत विठ्ठल, नामदेव आणि तुकारामांचे विचार समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. आमच्या सोबत आफ्रिका, मॉरिशियस येथूनदेखील वारीमध्ये सहभागी झाले आहेत.

- गीताश्री खेंते, नाशिक

आजच्या तरुणाईसाठी वारी केवळ धार्मिक परंपरा नसून संस्कृती, अध्यात्म आणि सामाजिक एकतेचा अनुभव आहे. आयटी, इंजिनिअरिंग आणि विविध उच्चशिक्षित क्षेत्रांत कार्यरत असलेले तरुण वारीत उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातही संतांच्या विचारांशी आणि संस्कारांशी नाते जोडण्याची त्यांची इच्छा दिसून येते.

- नलिनी पाठक, नाशिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT