नाशिक : निखिल रोकडे
'तुमच्या नावावर गुन्हा आहे... तुमचे खाते मनी लॉड्रिगसाठी वापरले गेले आहे... सीबीआयकडून चौकशी सुरू आहे...' मोबाइल स्क्रीनवर गणवेशातील अधिकारी दिसतो... मागे पोलिस ठाण्यासारखा सेटअप... समोर सरकारी कागदपत्रे... आवाजात अधिकाराचा धाक... आणि काही क्षणांतच आदेश येतो - 'फोन ठेवायचा नाही, कोणाशी बोलायचे नाही, घराबाहेर पडायचे नाही!'
भीतीने गांगरलेल्या नागरिकाला पुढे सांगितले जाते, 'तुमच्या खात्यातील पैसे तपासासाठी दुसऱ्या खात्यावर वर्ग करा.' विश्वास ठेवताच काही मिनिटांत किंवा तासांत लाखो-कोट्यवधी रुपये दुसऱ्या खात्यात जातात. त्यानंतर समोरचा 'अधिकारी' गायब ! नाशिकमध्ये सायबर गुन्हेगारांनी 'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली उभारलेला हा धक्कादायक सापळा आता चिंतेचा विषय झालेला आहे. जून २०२६ पर्यंत देशभरात ३२.८० लाखांहून अधिक तक्रारींमध्ये ११,१५८ कोटी रुपयांहून अधिक रक्कम वाचविण्यात आल्याचे केंद्र सरकारने सांगितले आहे.
नाशिकमध्ये १ कोटी ६० लाखांचा झटका !
एप्रिल २०२६ मध्ये नाशिकमधील ६२ वर्षीय सेवानिवृत्त खासगी कंपनी कर्मचाऱ्याला सायबर भामट्यांनी तब्बल १ कोटी ६० लाख रुपयांचा गंडा घातला. त्यांच्या नावावर बँक खाते उघडण्यात आले असून, त्याचा संबंध दहशतवादी कारवाया आणि मनी लॉड्रिगशी असल्याचा बनाव करण्यात आला होता.
'तुमचे नाव या प्रकरणातून काढायचे असेल, तर पैसे तपासासाठी वर्ग करा,' असे सांगून विविध व्यवहारांद्वारे रक्कम उकळण्यात आली. कुटुंबीयांना सांगितल्यास अटक होईल, अशी धमकी देऊन पीडिताला मानसिकदृष्ट्या एकटे पाडण्यात आले. नाशिक शहरातील २०२६ मधील हा तिसरा 'डिजिटल अरेस्ट' प्रकार असल्याची माहिती समोर आली आहे. सायबर भामट्यांना आता 'सॉफ्ट टार्गेट' ची गरज राहिलेली नाही. डॉक्टर असो, निवृत्त अधिकारी असो किंवा उच्चशिक्षित नागरिक, भीती निर्माण झाली की, निर्णयक्षमता क्षणात कोलमडते.
डीपफेक तंत्रज्ञानामुळे धोका वाढला
ए आय आणि डीपफेक तंत्रज्ञानामुळे हा धोका अधिक वाढला आहे. काही सेकंदांच्या आवाजाच्या नमुन्यावरूनही व्यक्तीच्या आवाजाची हुबेहूब नक्कल तयार करता येत असल्यामुळे नातेवाईक किंवा परिचित व्यक्तीच्या आवाजातूनही पैशांची मागणी केली जाऊ शकते.
गणवेश खरा... कार्यालय खोटे !
सायबर गुन्हेगारांनी या फसवणुकीला अक्षरशः नाट्यरूप दिले आहे. बनावट पोलिस ठाणे, सरकारी कार्यालयासारखा सेटअप, गणवेश, बनावट शिक्के, कागदपत्रे आणि सरकारी लोगो वापरून नागरिकांच्या मनात विश्वास निर्माण केला जातो.
नाशिकमधील मोठे आकडे प्रकार फसवणूक
२०२६ मधील निवृत्त कर्मचारी १.६० कोटी
२०२५ मधील ७४ वर्षीय महिला ...२.६० कोटी
मालेगावातील महिला डॉक्टर
नाशिकमधील २०२५ मधील ४२ लाख
एकूण डिजिटल अरेस्ट फसवणूक सुमारे १६ कोटी
अशा वेळी हे करा
फोन आला? घाबरू नका.
व्हिडिओ कॉल आला? विश्वास ठेवू नका.
अटक करण्याची धमकी दिली? फोन कट करा.
पैसे मागितले ? एक रुपयाही पाठवू नका.
संशय आला? कुटुंबीयांना सांगा.
फसवणूक झाली? तातडीने १९३० वर कॉल करा.
१९३० : प्रत्येक सेकंद महत्त्वाचा !
सायबर फसवणूक झाल्यानंतर तक्रार करण्यास विलंब करू नये.
डिजिटल अरेस्ट असा कुठलाही प्रकार अस्तित्वात नाही. नागरिकांनी याबाबत सजग राहण्याची आवश्यकता आहे अशा प्रकारची अटक करण्याचा कोणालाही अधिकार नाही, जर असे काही होत असेल तर नागरिकांनी त्वरित पोलिस यंत्रणेशी संपर्क साधावा.
- संदीप मिटके, गुन्हे शाखा, सहायक पोलिस आयुक्त
सायबरसंदर्भात जनजागृती आवश्यक आहे. ऑनलाइन फसवणुकीचे वेगवेगळे प्रकार दिवसागणिक वाढत आहेत. मोबाइलवर काही अनोळखी वाटल्यास त्यावर क्लिक करू नये. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यास तत्काळ नजीकच्या सायबर पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा.
- शिफा इनामदार, सायबर वॉरियर