Goat Theft Case 
नाशिक

Goat Theft Case | धुळ्यात 'स्विफ्ट' गँगचा हैदोस! घरांना बाहेरून कड्या लावून 15 शेळ्यांसह 21 जनावरे लंपास

Goat Theft Case | धुळे जिल्ह्यातील सोनगीर परिसरात चोरीच्या घटनांनी पुन्हा डोके वर काढले असून पशुपालक शेतकरी मोठ्या चिंतेत सापडले आहेत.

पुढारी वृत्तसेवा

धुळे जिल्ह्यातील सोनगीर परिसरात चोरीच्या घटनांनी पुन्हा डोके वर काढले असून पशुपालक शेतकरी मोठ्या चिंतेत सापडले आहेत. सोनगीर येथील अहिल्यानगर वस्तीतून सुमारे अडीच लाख रुपयांच्या १५ शेळ्या आणि ६ पिले चोरीस गेल्याची घटना मध्यरात्री २ ते ३ वाजेच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी रात्रीच्या वेळी अहिल्यानगर वस्तीतील घरांच्या बाहेरून कड्या लावून लोकांना घरातच अडकवले. त्यानंतर अंगणात बांधलेल्या शेळ्या आणि त्यांची पिले चोरून नेली. या चोरीत किशोर जाधव यांच्या ३ शेळ्या, अंबादास बडगुजर यांच्या ९ शेळ्या तसेच चेतन पाटील यांच्या ३ शेळ्या आणि ६ पिले लंपास करण्यात आली.

चोरीची चाहूल लागताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ पोलिसांच्या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधला. पोलिस घटनास्थळी पोहोचले; मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले होते.

विशेष म्हणजे अल्पभूधारक शेतकरी चेतन पाटील यांच्या दोन महिन्यांपूर्वीच सुमारे दोन लाख रुपयांच्या १६ शेळ्या चोरीला गेल्या होत्या. त्या घटनेचा तपास लागण्यापूर्वीच पुन्हा एकदा त्यांच्या शेळ्या चोरीला गेल्याने त्यांना मोठा आर्थिक धक्का बसला आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, ही चोरी करणारी टोळी स्विफ्ट कारचा वापर करत असल्याची शक्यता आहे. चोरटे रात्री गावात येतात, घराबाहेरील कड्या लावून पशुधन वाहनात भरतात आणि लगेच पसार होतात, अशी माहिती नागरिकांनी दिली.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी बालाजीनगर येथे मध्यरात्री घरफोडी करून सुमारे पाच लाख रुपयांचे सोने-चांदीचे दागिने आणि एक लाखांची रोकड चोरीला गेली होती.

तसेच राजकुमार नगर येथे बंद घरातील कपाट फोडून सुमारे ५.२५ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले होते. याशिवाय सोनगीर पोलीस हद्दीतील कापडणे येथेही अडीच लाखांची रोकड आणि २६ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरीला गेले होते.

या सलग घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांचा बंदोबस्त करून परिसर भयमुक्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

दरम्यान पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून संशयास्पद व्यक्ती किंवा वाहन आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्यास सांगितले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT