धुळे : पुढारी वृत्तसेवा
राजस्थानातील खाटू श्याम येथून दर्शन घेऊन परतत असणाऱ्या क्रूझर गाडीला कोटा-उदयपूर महामार्गावर शंभूपुरा गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात धुळे जिल्ह्यातील नऊ जणांचा मृत्यू झाला. अपघातातील मयत एकमेकांचे नातेवाईक असून, एकाच परिवारातील चौघांचा समावेश आहे. मृतांत धुळे शहरातील सहा, तर शिंदखेडा तालुक्यातील अमराळे येथील तिघांचा समावेश आहे.
अपघातात गंभीर जखमी झालेल्या सात जणांना उपचारासाठी कोटा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. धुळे येथील साक्री रोड परिसरात राहणारे पवार कुटुंबीय मध्य प्रदेश आणि राजस्थानात देवदर्शनासाठी तीन वेगवेगळ्या गाड्यांमध्ये गेले होते. या कुटुंबाने दि. १७ नोव्हेंबरपासून तीर्थयात्रा सुरू केली होती.
यात त्यांनी उज्जैन, ओंकारेश्वर, पुष्कर तसेच सालासार बालाजी येथे दर्शन घेऊन खाटू श्याम यांचे दर्शन घेतले. तेथून ते शनिवारी (दि. २१) धुळ्याकडे परतीच्या प्रवासासाठी निघाले होते. दरम्यान, या तीनही गाड्या जयपूरनजीक अल्पोपहारासाठी थांबल्या. यातील क्रूझर गाडी आधी रवाना झाली. ही गाडी कोटा उदयपूर महामार्गावरील शंभूपुरा गावाजवळ पोहोचली, तेथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर क्रूझर आदळली. या भीषण अपघातामध्ये गाडीचा चक्काचूर झाला.
क्रूझर गाडीमधील नऊ जण ठार झाले, तर सात जण गंभीर जखमी झाले. दरम्यान, या अपघाताची माहिती अपघातग्रस्त गाडीमधील जखमी मुलीने अन्य गाडीमधील व्यक्तींना कळवली. दोन्ही गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या. मृत व्यक्तींमध्ये धुळे शहरातील शांतिगीतनगरातील चौघे, नवनाथनगरातील दोन, तर अमराळे येथील तिघांचा समावेश आहे.
जखमी व्यक्तींमध्ये धुळे शहरातील नवनाथनगर येथील दोघे, शांतिगीतनगर येथील दोघे आणि शिंदखेडा तालुक्यातील अमराळे येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. जखमींना कोटा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. धुळ्यातून या परिवाराचे नातेवाईक रवाना झाले आहेत.
मृतांमध्ये उषाबाई सज्जन पवार (६० वर्षे), सान्वी गणेश पवार (६), सज्जन दौलत पवार (७०), माधवी गणेश पवार (४५, सर्व रा. शांतिगीतनगर, धुळे), कैलास भगवान पवार (४५), अनिता कैलास पवार (४०), जान्हवी कैलास पवार (१३, सर्व रा. अमराळे, ता. शिंदखेडा) आणि बाबूलाल दौलत पवार (७३), सुशीलाबाई बाबूलाल पवार ६५ वर्षे, दोघे रा. नवनाथनगर, धुळे).
जखमींमध्ये मनीषा शरद पवार (४१ वर्षे), मयूरी शरद पवार (२०), शरद बाबूलाल पवार (४५, सर्व रा. नवनाथनगर, धुळे), जगदीश कैलास पवार (१०, रा. अमराळे, ता. शिंदखेडा), क्षितिज गणेश पवार (४), गणेश सज्जन पवार (३२, सर्व रा. शांतिगीतनगर, धुळे).
राजस्थानमधील कोटा-उदयपूर महामार्गावर शंभूपुरा गावाजवळ धुळे जिल्ह्यातील भाविकांच्या वाहनाला झालेल्या अपघातात ९ जण मृत्युमुखी पडल्याच्या घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापनमंत्री गिरीश महाजन यांनी तातडीने राजस्थानमधील कोटा येथील जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून मदतकार्याचा आढावा घेतला.
मंत्री गिरीश महाजन यांनी कोटा येथील जिल्हाधिकारी राजेश जोशी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. कोणत्याही प्रकारचा विलंब न करता, जखमींना तातडीने वैद्यकीय उपचार उपलब्ध करून द्यावेत तसेच आवश्यकतेनुसार त्यांना अधिक चांगल्या आणि अद्ययावत वैद्यकीय सुविधा असलेल्या रुग्णालयात दाखल करावे, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. याशिवाय राजस्थानमधील पोलिस प्रशासन, स्थानिक प्रशासन आणि शासकीय रुग्णालयांतील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.