नाशिक

Dhule News : पांझराकान साखर कारखाना वाचविण्यासाठी आम्ही जनतेसोबत : डॉ. तुळशीराम गावित यांची ग्वाही

गणेश सोनवणे

पिंपळनेर: (जि.धुळे) पुढारी वृत्तसेवा- साक्री तालुक्यातील पांझराकान सहकारी साखर कारखाना वाचविण्यासाठी आमचे शासकीय पातळीवर प्रयत्न सुरु असून, कारखाना सुरू करण्यासाठी आम्ही तालुक्यातील जनतेबरोबर राहू, अशी ग्वाही डॉ. तुळशीराम गावित यांनी दिली.

भाडणे येथील पांझराकान साखर कारखाना बचाव समितीच्या वतीने साक्री येथे बुधवारी शेतकरी, कामगारांची संयुक्त बैठक ना.बु,छात्रालयाच्या जे.यु ठाकरे सभागृहात घेण्यात आली. अध्यक्षस्थानी डॉ.तुळशीराम गावित होते. प्रमुख वक्ते म्हणून रावळगाव कारखान्याचे चेअरमन बबनराव गायकवाड उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला मेळाव्याचा उद्देश आणि चळवळीचा इतिहास व कामगारांची भूमिका याबाबत कॉ.सुभाष काकुस्ते यांनी निवेदन केले. यानंतर एन.एन.पाटील यांनी परिसरातील ऊसाचे क्षेत्र, शेतकऱ्यांची मानसिकता आणि कारखान्याची परिस्थिती याबाबत विचार मांडले.

रावळगावचे चेअरमन बबन गायकवाड यांनी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. शशिकांत भदाणे यांनी शेतकरी संघटनेची भूमिका स्पष्ट केली. सत्यशोधक चवळीचे कॉ. किशोर ढमाले यांनी पांझराकान साखर कारखाना सुरू होणे काळाची गरज आहे व त्यासाठी आदिवासी शेतकऱ्यांचा कल आता ऊस लागवडीकडे वाढला आहे. त्यामुळे कारखाना सुरू झाला तर, उसाचा पुरवठा अपूर्ण पडू देणार नाही असे सांगितले. याप्रसंगी भटू आकलाडे, भास्कर काकुस्ते, ऋषिकेश मराठे, भाडणेचे सरपंच अजय सोनवणे, कुंदन चव्हाण यांनी विचार मांडले. बैठकीस जेष्ठ नेते उत्तमराव देसले, प्रदीप सोनवणे, गुलाबराव काकुस्ते, गोकुळ परदेशी, नारायण भदाणे, गिरीश नेरकर, साहेबराव कुवर आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. कारखाना सुरु करण्यासाठी सर्व शक्तीनिशी उभे राहू,असा ठाम निर्धार शेतकरी आणि कामगारांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रास्ताविक प्रा.नरेंद्र तोरवणे यांनी तर आभार अशोक भामरे यांनी मानले.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT