पिंपळनेर(जि. धुळे) पुढारी वृत्तसेवा– साक्री तालुक्यातील गुजरात महाराष्ट्र बॉर्डर वर वसलेलं बसरावळ हे आदिवासी गाव, या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत बिकट अवस्थेत आहे. पावसाळ्यामध्ये शाळा पूर्णतः गळते त्यामुळे गावातील सर्व मुलांना शाळेबाहेर बसून शिकावं लागतं व याचा परिणाम मुलांच्या भविष्यावर होतो, हीच गोष्ट लक्षात घेऊन गावातील जीवन उन्नती व प्रगती ग्राम संघाच्या जवळपास 35 महिला बचत गटांनी शाळा दुरुस्त करण्याचा संकल्प हाती घेतला आहे.
थेंबे थेंबे तळे साचे या म्हणी प्रमाणे सर्व बचत गटांनी जवळपास 17500 रुपये जमवले व शाळेतील शिक्षकांकडे सोपविले आहे. या पैशातून जेवढे काम होईल तेवढे काम करून घ्यावे अशी विनंती महिलांनी केली आहे. या उपक्रमाबद्दल बचत गटातील महिलांना अधिक विचारले असता त्या म्हणाल्या कि 'या शाळेमध्ये आमचीच मुलं शिकतात शाळेची अवस्था बघून आमच्या मनामध्ये कायम भीतीचं वातावरण असतं की कधी एखादी भिंत पडेल आणि काय होईल, आमच्या एवढ्या पैशाने जास्त काही फरक पडणार नाही हे आम्हाला माहिती आहे पण जर ही बातमी प्रशासनापर्यंत पोहोचली तर शाळा प्रशासन आम्हाला नक्कीच मदत करेल व शाळेचे भविष्य अजून चांगले असेल अशी आशा आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी दोन्ही ग्राम संघातील महिलांनी एकजूट दाखवली व पुढाकार घेतला.
दीड वर्षापासून वीस गावांत काम
"आगाखान ग्राम समर्थन कार्यक्रम (भारत) संस्थामागील दीड वर्षापासून पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यातील वीस गावात कार्य करते. गावातील सर्व बचत गटांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून बळ देणं व महिलांमधील नेतृत्वगुणाला चालना देणं हे काम करते. त्याचाच भाग म्हणून 'ग्रामविकासामध्ये ग्रामसंघाची भूमिका' या विषयावर प्रशिक्षण घेण्यात आलं होतं त्यानंतर सर्व महिलांनी हा उपक्रम घेण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा :