Dhondyacha Mahina tradition  
नाशिक

Dhondyacha Mahina tradition | धोंड्याचा महिना : जावईबापूंच्या स्वागतासाठी घराघरांत लगबग

परंपरा आजही कायम; अधिक मासात जावयांचा खास सन्मान

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : धोंड्याचा महिना रविवार (दि.१७) पासून सुरू झाला आहे. त्यामुळे शहरासह खेड्यापाड्यांत देखील लगबग सुरू झालेली दिसून येत आहे. या महिन्यात लाडक्या जावयांची खास उठबस असते. त्यांच्यासाठी खास जेवणाचा बेत आखला जातो. कपडेलते घेतले जातात. त्यामुळे जावयांचा थाट काही औरच असतो. अधिक ज्येष्ठ महिन्याला अर्थात अधिक मासाला सुरुवात झाली असून, १५ जूनपर्यंत धोंड्याच्या महिन्याची सांगता होणार आहे. दर तीन वर्षांनी येणाऱ्या या विशेष महिन्याला हिंदू संस्कृतीत मोठे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे.

या महिन्यात जावयाचा मानपान करण्याची परंपरा आजही ठिकठिकाणी उत्साहाने पाळली जात असल्याचे चित्र आहे. आनंदी अधिक मासातील प्रत्येक दिवस हा शुभ मानला जातो. जावयाच्या सोयीने त्याला घरी आमंत्रित करून सुग्रास भोजन, भेटवस्तू आणि मानपान केला जातो. काळानुसार या परंपरेतही बदल झाले असून, अनेकजण चांदीचे ताम्हण, निरांजन, पेला अशा वस्तू भेट म्हणून देतात. यंदा सोने-चांदी महागले असले तरी परंपरा आणि हौसेला मोल नसल्याने लाडक्या जावयासाठी अनमोल अशी भेटवस्तू खरेदी करण्याकडे कल दिसून येत आहे. पारंपरिक पद्धतीनुसार तीस-तीन अनारसे, म्हैसूरपाक किंवा बत्तासे यांसारखे सच्छिद्र पदार्थ वाण म्हणून देण्याची प्रथा आजही पूर्वापारपासून पाळली जात आहे.

अधिक मासाच्या निमित्ताने विवाहित महिलांमध्ये जोडवी बदलण्याची प्रथा आहे. सौभाग्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या जोडवी दर तीन वर्षांनी नव्याने घेण्याची पद्धत कुटुंबांत पाळली जाते. आजकाल विविध नक्षीदार आणि आधुनिक प्रकारची जोडवी उपलब्ध असल्याने महिलांमध्येही या परंपरेबाबत उत्साह दिसून येतो आहे.

धोंड्याचा महिना नाव कसे पडले ?

मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात अधिक मासाला धोंड्याचा महिना असे संबोधले जाते. नियमित कालगणनेत मध्येच आलेल्या दगडासारख्या अतिरिक्त महिन्यामुळे हे नाव पडल्याचे एक मत प्रचलित आहे. याशिवाय धोंडा नावाच्या खाद्यपदार्थाशीही या महिन्याचा संबंध जोडला जातो. नागपंचमीला तयार होणाऱ्या दिंड या पदार्थाप्रमाणेच पुरण भरून गोल आकारात उकडलेला पदार्थ मराठवाड्यात धोंडा म्हणून ओळखला जातो. अधिक मासात हा नैवेद्य विशेष मानला जातो. जावयाला आग्रहाने धोंडे वाढले जातात

परंपरा बदलल्या, पण नात्यांची ऊब कायम

काळानुसार सण-उत्सव साजरे करण्याच्या पद्धती बदलल्या तसेच भेटवस्तूंचे स्वरूप बदलले असले तरी नात्यांमधील जिव्हाळा आणि परंपरेची साखळी आजही कायम आहे. अधिक मासातील धोंडा जेवण ही परंपरा केवळ विधी नसून कुटुंबातील नात्यांना अधिक घट्ट करणारा सांस्कृतिक उत्सव मानला जातो.

दर तीन वर्षांनी येणारा अधिक मास आमच्यासाठी खास असतो. आधीच्या काळी फक्त साधी जोडवी असायची, पण आता बाजारात खूप फॅन्सी डिझाईन्स आले आहेत. परंपरेचा मान राखत आम्ही या वेळी मीनाकाम केलेली आणि अमेरिकन डायमंडची जोडवी खरेदी केली. त्यामुळे पायाची शोभा तर वाढतेच, शिवाय जुनी जोडवी बदलून नवीन डिझाईन घालण्याची हौसही पूर्ण होते.
- स्नेहा कुलकर्णी, कॉलेजरोड

लग्नानंतरचा माझा हा पहिलाच अधिक मास आहे. आमच्याकडे पद्धत आहे की, अधिक मासात आई आपल्या मुलीला नवीन जोडवी घेऊन देते किंवा तिची ओटी भरते. माझ्या आईने मला पारंपरिक मासोळी आकाराची नक्षीदार जोडवी घेऊन दिली आहेत. हा प्रसंग माझ्यासाठी भावनिक आणि अत्यंत सुखावणारा आहे.

- पूजा धोंडगे, पंचवटी

पायात जोडवी घालण्यामागे केवळ सौंदर्य नसून वैज्ञानिक कारणही आहे, असे घरातील ज्येष्ठ लोक सांगतात. जोडव्याचा दाब पायाच्या विशिष्ट नसांवर पडतो, जो महिलांच्या आरोग्यासाठी चांगला असतो. अधिक मासाच्या निमित्ताने नवीन, घट्ट आणि योग्य मापाची शुद्ध चांदीची जोडवी घातल्याने पायाला आराम मिळतो आणि सणाचा आनंदही द्विगुणित होतो.

- मनीषा सोनवणे, सिडको

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT