Dharmendra Pradhan 
नाशिक

Dharmendra Pradhan | 'धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या'

Dharmendra Pradhan Resignation Demand | 'धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या'; पेपरफुटी, बेरोजगारीविरोधात एल्गार : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

'केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या...', 'पेपरफुटीची जबाबदारी स्वीकारा...', 'सीता के पती का नाम लेके, नीता के पती का काम बंद करो !' अशा थेट आणि अत्यंत शेलक्या शब्दांतील फलक हातात घेऊन संतप्त युवा कार्यकर्त्यांनी सोमवारी (दि. २०) नाशिकच्या रस्त्यावर उतरत मोदी सरकारविरोधात जोरदार एल्गार पुकारला.

परीक्षा व्यवस्थेतील महाघोटाळे आणि वाढत्या बेरोजगारीने संतप्तलेल्या तरुणाईचा हा आक्रोश थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मागण्या मान्य होईपर्यंत मागे न हटण्याचा पवित्रा घेत मोर्चाकर्त्यांनी तब्बल दोन तास भररस्त्यात ठिय्या मांडल्याने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. तसेच सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत त्यांना तात्काळ सोडण्याची मागणी केली.

सीबीएस येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सोमवारी सकाळी १० पासूनच युवक जमण्यास सुरुवात झाली. डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून धरणे आंदोलनाला सुरुवात झाली. त्यानंतर मोठ्या संख्येने जमलेल्या युवकांनी छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिवीर महात्मा जोतिबा फुले यांचे फोटो तसेच संविधानाची प्रत हातामध्ये घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने मार्गक्रमण झाले.

यावेळी विद्यार्थी विरोधी शिक्षण रद्द झालेच पाहिजे, 'इन्कलाब जिंदाबाद', 'गली गली मे शोर है, मोदी सरकार चोर है', अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा दाखल झाल्यानंतर युवकांनी आक्रमक होत जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊ देण्याची मागणी केली. मात्र पोलिसांनी ही मागणी नाकारत त्यांना कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच रोखले. त्यामुळे आक्रमक झालेल्या युवकांनी शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करीत या ठिकाणी तब्बल दोन तास ठिय्या मांडला.

यावेळी युवकांनी संतप्त भावना व्यक्त करत प्रश्न विचारण्याचा सर्वांना अधिकार आहे, आम्ही प्रश्न विचारणारच, अशी भूमिका मांडली. त्यानंतर शिष्टमंडळाच्या वतीने मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. या आंदोलनात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डॉ. डी. एल. कराड, राजू देसले, शिक्षण बाजारीकरणाविरोधी मंचचे डॉ. मिलिंद वाघ, मुकुंद दीक्षित, ॲड. तानाजी जायभावे, सीताराम ठोंबरे, तल्हा शेख, श्यामला चव्हाण यांच्यासह ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनचे सदस्य, पुरोगामी लोकशाही प्रेमी पक्ष संस्था व संघटना पदाधिकारी व युवक सहभागी झाले होते.

आंदोलनकर्त्यांच्या मागण्या

  • केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

  • शिक्षणाचे बाजारीकरण थांबवावे

  • शिक्षणव्यवस्थेवर बजेटच्या सहा टक्के खर्च करून सार्वजनिक शिक्षणव्यवस्थेचा पाया मजबूत करावा

  • सामायिक प्रवेश परीक्षा कायमची रद्द करून त्याऐवजी १२वी गुणांवर प्रवेशप्रक्रिया राबवावी

वांगचुक यांच्या लढ्याला पाठिंबा

आंदोलनादरम्यान केवळ स्थानिक आणि राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांच्या मुद्द्यांवरच नव्हे, तर देशातील लोकशाही हक्कांसाठी लढणारे ख्यातनाम सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनालाही युवा कार्यकर्त्यांनी जाहीर पाठिंबा दिला. वांगचुक यांच्या लढ्याशी नाशिकमधील तरुण एकनिष्ठ असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT