MLA Saroj Ahire file
नाशिक

MLA Saroj Ahire |"देवळालीत तीव्र भारनियमन तातडीने थांबवा! आमदार सरोज अहिरे यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे हस्तक्षेपाची मागणी"

MLA Saroj Ahire | तीव्र भारनियमन तातडीने थांबवा, आ. सरोज अहिरे यांची मुख्यमंत्र्यांकडे थेट हस्तक्षेपाची मागणी

पुढारी वृत्तसेवा

देवळाली कॅम्प : पुढारी वृत्तसेवा

देवळाली विधानसभा मतदारसंघासह ग्रामीण भागात सुरू असलेल्या तीव्र भारनियमनामुळे नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि व्यापारी वर्ग त्रस्त झाला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार सरोज अहिरे यांनी थेट दूरध्वनीच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती देताना भारनियमन तातडीने थांबवण्याची मागणी केली.

आ. अहिरे यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करताना सांगितले की, आपण ४८ हजार कोटींची वीजमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या भारनियमनामुळे या चांगल्या निर्णयावरही पाणी फिरत आहे. त्यामुळे तातडीने भारनियमन बंद करण्याची मागणी केली.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मकता दर्शवित संबंधितांना सूचना करतो, असे सांगितले. भारनियमन होण्याचे कोणतेही कारण नाही. रात्री कृषी फीडर बंद पडत असल्यामुळे अडचण येत असल्याची शक्यता मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्याची माहिती अहिरे यांनी दिली.

आ. अहिरे यांनी ग्रामीण भागात अनेक तास वीजपुरवठा खंडित राहत असल्यामुळे शेतीच्या पिकांना पाणी देणे, व्यावसायिक व्यवहार आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर विपरीत परिणाम होत असल्याचे निदर्शनास आणून दिले.

महावितरणला तातडीने सूचना देऊन नियमित वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी त्यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी या विषयाची गांभीर्याने दखल घेत संबंधित विभागाशी तातडीने चर्चा करून आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले, अशी माहिती आ. अहिरे यांनी दिली.

पाठपुरावा करणार

भारनियमनाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा आणि ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे आ. सरोज अहिरे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT