नाशिक : पावसामुळे ठिकठिकाणी साचलेल्या पाण्याच्या डबक्यांमुळे शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला आहे. जुलैच्या पहिल्या आठ दिवसांतच डेंग्यूचे २९ नवे रुग्ण आढळले आहेत. यात सिडको, सातपूर आणि नाशिकरोड विभागातील डेंग्यू बाधितांची संख्या अधिक आहे. त्यामुळे महापालिकेचा वैद्यकीय विभाग सतर्क झाला आहे.
शहरात यंदा मे महिन्यापासून पावसाचा जोर कायम आहे. पावसामुळे ठिकठिकाणी पाण्याची डबकी साचल्याने जूनमध्ये डेंग्यूचे पुनरागमन झाले. डेंग्यू आजारास कारणीभूत ठरणाऱ्या एडीस इजिप्ती या प्रजातीच्या डासांची उत्पत्ती स्वच्छ पाण्यातच होते. पावसामुळे घर परिसरातील नारळाच्या करवंट्या, निकामी टायर्स, शोभेच्या वनस्पतींच्या कुंड्या आदींमध्ये पाणी साचते. त्यात डासांची पैदास होऊन प्रादुर्भाव वाढू लागला आहे. मे महिन्यात डेंग्यूचे आठ रुग्ण आढळून आले होते. तर, जूनमध्ये २५ रुग्ण आढळले. त्यानंतर सततच्या पावसामुळे जुलैमध्ये डेंग्यूचा उद्रेक पाहायला मिळत आहे. जुलैच्या दहा दिवसांतच डेंग्यूचे तब्बल २९ बाधित रुग्ण आढळून आलेत. त्यात नाशिकरोड विभागात सर्वाधिक १२, सिडको व सातपूर विभागात प्रत्येकी पाच, नाशिक पूर्व चार, पंचवटी दोन व नाशिक पश्चिम विभागातील एका रुग्णाचा समावेश आहे. जानेवारीपासून आतापर्यंत १७६ जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. मलेरिया विभागप्रमुख डॉ. प्रशांत कोशिरे यांनी ही माहिती दिली आहे.
डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर महापालिकेच्या वैद्यकीय विभागांतर्गत मलेरिया विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. शहरातील सहाही विभागांत डेंग्यू डासांची उत्पत्तीस्थाने शोधण्याची मोहीम सुरू आहे. ठेकेदाराकडून केल्या जात असलेल्या धुरळणी फवारणीचाही अहवाल मागवला आहे. गुरुवारी (दि. १०) मलेरिया विभागाने राजीवनगरमधील डासांची उत्पत्तीस्थाने आढळलेल्या भगवती रेसीडेन्सीवर कारवाई करत, बिल्डरला दहा हजारांचा दंड ठोठावला आहे.