नाशिक : शहरापाठोपाठ आता जिल्ह्यात ग्रामीण भागात डेंग्यू रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. जुलैतील 87 रुग्णांची संख्या ऑगस्टमध्ये 206 वर पोहोचून अडीच पट वाढ झाली आहे. आतापर्यंत एकूण 580 रुग्ण आढळले आहेत. डेंग्यूबरोबरच चिकुनगुनियाचे रुग्णही तिपटीने वाढले आहेत. वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात, तसेच शहरातही डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत. यंदा संपूर्ण मे महिना तर, मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात बदल झाला होता. व्हायरल इन्फेक्शनचे रुग्णही वाढले होते. यात ताप ही सर्वसाधारण लक्षणे आढळणारे मोठे रुग्ण आहेत. त्यामुळे मलेरिया, डेंग्यू, कावीळ, चिकुनगुनिया किंवा पेशी कमी होणे या कारणासाठी दवाखान्यात दाखल होणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे.
जानेवारी महिन्यात 88 डेंग्यूचे रुग्ण, फेब्रुवारीत 53, मार्चमध्ये 33, एप्रिलमध्ये 31, मे मध्ये 31, जूनमध्ये 51, जुलै मध्ये 87 तर, ऑगस्ट महिन्यात 206 डेंग्यूचे रूग्ण आढळले असल्याची नोंद आरोग्य विभागाकडे झाली आहे. ऑगस्ट महिन्यातील बदलत्या वातावरणामुळे रूग्णसंख्या वाढली आहे. या महिन्यात पाऊस उघडीप दिली होती. त्यामुळे रूग्ण वाढल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे. सद्यस्थितीत अनेक रुग्ण डेंग्यूचे आहेत. परंतु, ते केवळ खासगी दवाखान्यात असून, ते शासकीय यंत्रणेला याबाबत काहीही माहिती कळवत नाहीत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून उपाययोजना सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी दिली.
जिल्ह्यात आतापर्यंत चिकणगुणियाचे 93 रूग्ण आढळले. यात ग्रामीणमध्ये 50, नाशिक महापालिका क्षेत्रात 42, तर मालेगाव महापालिका क्षेत्रात 1 चा समावेश आहे. जानेवारीत 14, फेब्रुवारीत 7, मार्चमध्ये 4, एप्रिल 1, मे 3, जूनमध्ये 11, जुलैमध्ये 13, ऑगस्टमध्ये 40 रूग्ण सापडले आहे.
आतापर्यंत जिल्ह्यात मेलरियाचे 31 रूग्ण सापडले आहेत. यात नाशिक महापालिका क्षेत्रात सर्वाधिक 22, त्यापाठोपाठ ग्रामीण भागातील 9 रूग्णांचा यात समावेश आहे. जुलै महिन्यात मलेरियाचे सर्वाधिक 13 रूग्ण सापडले होते. ऑगस्टमध्ये ही संख्या कमी झाली आहे.