

नाशिक : शहरात डेंग्यू पाठोपाठ चिकुनगुनियाचीही एन्ट्री झाली आहे. गेल्या तीन आठवड्यातील डेंग्यु बाधितांचा आकडा ९५वर पोहोचला आहे, तर चिकुनगुनियाचे ३९ रुग्ण आढळले आहेत. तसेच मलेरियाचे देखील दोन संशयित रुग्ण आढळल्याने साथीच्या आजारांचा धोका वाढला आहे. त्यामुळे वैद्यकीय विभाग अलर्ट मोडवर आला आहे.
यंदा पावसाने कहर केला आहे. मे महिन्यात अवकाळीने दणका दिल्यानंतर जूनपासून सुरू झालेला पाऊस अपवाद वगळता आजतागायत सुरू आहे. त्यामुळे शहरात कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढला आहे. डेंग्यूच्या एडीस इजिप्ती या प्रजातीच्या डासांची उत्पत्ती स्वच्छ पाण्यातच होते. पावसामुळे घर परिसरातील नारळाच्या करवंट्या, निकामी टायर्स, शोभेच्या वनस्पतींच्या कुंड्या आदींमध्ये पाणी साचते. या स्वच्छ पाण्यात डेंग्यू डासांची पैदास होत असल्याने डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे.
मे महिन्यात १७ रुग्ण, जूनमध्ये २५ रुग्ण आढळले होते. जुलैत रुग्णसंख्या ८४ वर जावून पोहोचली होती. तर ऑगस्टमध्ये तीन आठवड्यातच ९५ डेंग्यूबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे ऑगस्टमध्ये डेंग्यूबाधितांचा आकडा शंभरी ओलांडणार असल्याने वैद्यकीय विभाग सतर्क झाला आहे. जानेवारीपासून आतापर्यंत ३१७ जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. नाशिकरोड, सिडको, सातपूर या विभागात सर्वाधिक डेंग्यूचा उपद्रव पहायला मिळत आहे. डेंग्यूच्या अळ्या तपासण्यासाठी सहा विभागात मोहीम हाती घेण्यात आली असून, दंडात्मक कारवाई केली जात असल्याची माहिती मलेरिया विभागप्रमुख डॉ. प्रशांत कोशिरे यांनी दिली.
---
असे आढळले डेंग्यूरुग्ण
जानेवारी -३७
फेब्रुवारी - ३२,
मार्च -२१,
एप्रिल - १५,
मे - १७
जून - २५
जुलै - ८४
ऑगस्ट - ९५
एकूण - ३१७
----000