नाशिक : पावसामुळे ठिकठिकाणी साचलेली पाण्याची डबकी नाशकात डेंग्यूच्या प्रादुर्भावास कारणीभूत ठरली आहे. जुलैच्या गेल्या २१ दिवसांतच डेंग्यूचे ५४ नवे रुग्ण आढळले आहेत.
गेल्या महिन्यात २५ रुग्ण होते. त्यातुलनेत जुलैतील रुग्णसंख्या दुपटीपेक्षा अधिक वाढली आहे. दरम्यान, महापालिकेच्या मलेरिया विभागाने नोटीसा देऊनही पेस्ट कंट्रोलच्या कामात सुधारणा होत नसल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
नाशकात यंदा मे महिन्यापासूनच अवकाळी पावसाला सुरूवात झाली. महिनाभर कोसळलेल्या अवकाळीनंतर अपवाद वगळता जुन महिना देखील पावसातच गेला. पाठोपाठ जुलै देखील जोरदार पावसाचे राहिले. गेल्या आठवडाभरापासून पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र पावसाने साचलेली पाण्याची डबकी आता डासांच्या प्रादुर्भावाचे कारण ठरली आहे.
डेंग्यू आजाराच्या उत्पत्तीस कारणीभूत ठरणाऱ्या एडीस इजिप्ती या प्रजातिच्या डासाची उत्पत्ती स्वच्छ पाण्यात होते. पावसामुळे घर परिसरातील नारळाच्या करवंट्या, निकामी टायर्स, शोभेच्या वनस्पतींच्या कुंड्या आदींमध्ये पाणी साचले. या पाण्यात डेंग्यू डासांची पैदास होत असल्याने डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. गेल्या वर्षी पावसाळ्यात शहरात डेंग्यूचा उद्रेक पहावयास मिळाला होता. पाठोपाठ यंदाही डेंग्यूच्या रुग्णंसख्येत लक्षणीय वाढ होत असल्याचे चित्र आहे. गेल्या मे महिन्यात डेंग्यूचे अवघे आठ रुग्ण आढळून आले होते. जूनमध्ये २५ आणि आता चालू महिन्यात २१ दिवसातच ५४ रूग्ण आढळल्याने मलेरिया विभागासह आरोग्य वैद्यकीय विभाग ॲक्शन मोडवर आला आहे.
नाशिकरोड : २०
नवीन नाशिक : ०८
पंचवटी : ०४
नाशिक पूर्व : ०८
सातपूर : ०८
नाशिक पश्चिम : ०६
शाळांमधून जनजागृतीवर भर डेंग्युचे प्रमाण वाढत असल्याने मनपा आरोग्य वैद्यकीय विभागाने शाळांमधून विद्यार्थ्यांच्या माध्यमातून घराघरातून डेंग्युचा प्रादुर्भाव निर्माण होऊ नये तसेच प्रतिबंध कसा करावयाचा याविषयी जनजागृती देण्यावर भर दिला जात आहे.डॉ. विजय देवकर, मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका