ठाणे जिल्ह्यात डेंग्यू, मलेरियाचा वाढता प्रादुर्भाव pudhari photo
नाशिक

Nashik Dengue Malaria Cases | "नाशिक जिल्ह्यात डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण वेगाने वाढले!; आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर"

Nashik Dengue Malaria Cases | जुलै महिन्यातच डेंग्यूचे ९ रुग्ण तर मालेगाव महापालिका क्षेत्रात तब्बल १८ रुग्ण

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरापाठोपाठ आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागासह मालेगाव महापालिका क्षेत्रातही साथीच्या आजारांनी आपले डोके वर काढले आहे. पावसाचा जोर वाढत असतानाच ठिकठिकाणी कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वेगाने पसरत असल्याचे समोर आले आहे. एकट्या जुलै महिन्यातच जिल्ह्याच्या ग्रामीण भागात डेंग्यूचे ९ रुग्ण तर मालेगाव महापालिका क्षेत्रात तब्बल १८ रुग्ण आढळले आहेत. यासोबतच मलेरियाचाही शिरकाव झाला आहे.

जानेवारी ते जुलै या सात महिन्यांच्या काळात एकट्या ग्रामीण भागात ३२ जणांना डेंग्यूची लागण झाल्याची अधिकृत नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सतत सुरू असलेला पाऊस आणि बदलत्या हवामानामुळे साथीच्या आजारांना पोषक वातावरण तयार झाले आहे.

ठिकठिकाणी साचणारे सांडपाणी, उघड्यावरील कचरा, तसेच घरोघरी असलेल्या कुंड्या, कूलर व जुन्या टायर्समध्ये साचलेल्या स्वच्छ पाण्यात डासांची पैदास मोठ्या प्रमाणावर होत आहे. परिणामी डेंग्यू आणि मलेरियासारख्या आजारांचा आलेख वेगाने वर जात आहे. जुलै महिन्यात नोंदवलेली रुग्णांची संख्या पाहता आरोग्य प्रशासनाने तातडीने उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांमध्ये ताप, अंगदुखी आणि तीव्र डोकेदुखीचे रुग्ण वाढले आहेत. संशयित रुग्णांच्या रक्ततपासणीनंतर ९ जणांना डेंग्यू, तर एका रुग्णाला मलेरियाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

तर, जानेवारी ते जुलै या सात महिन्यात ३२ जणांना डेंग्यूची लागण झाल्याची नोंद आहे. मालेगाव महापालिका क्षेत्रात २२ दिवसात १८ डेंग्यूचे रुग्ण आढळले आहे. तर, जानेवारी ते जुलै या सात महिन्यात ६८ रुग्णांना डेंग्यूची लागण झालेली आहे. याच क्षेत्रात ११ जणांना चिकनगुनिया झाल्याची नोंद आहे.

सर्व रुग्णांवर स्थानिक आरोग्य केंद्र व रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. जानेवारी ते जुलै या सात महिन्यात जिल्ह्यात १५ जणांना मलेरियाची तर, तिघा जणांना चिकनगुनिया झाल्याची नोंद आहे. डेंग्यूची लागण रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT