नाशिक

भाजपकडून नाना पटोलेंच्या राजीनाम्याची मागणी, कार्यकर्त्याकडून पाय धुवून घेतल्याचे पडसाद

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा आमदार नाना पटोले यांनी अकोला दौऱ्यादरम्यान चिखलाने माखलेले पाय कार्यकर्त्याकडून धुवून घेतल्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. भाजपने या घटनेचा निषेध करत पटोल यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. हा प्रकार पुरोगामी महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला काळीमा फासणारा असल्याची टीका करत पटोले यांनी राजकारणातून संन्यास घ्यावा, अशी मागणी भाजप शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांनी केली आहे.

अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथील दौऱ्यादरम्यान पटोले यांनी चिखलाने माखलेले पाय कार्यकर्त्यांकडून पाण्याने धुवून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत. भाजपने या घटनेचा निषेध केला आहे. अनेक निवडणुकांत सातत्याने होणाऱ्या पराभवानंतर काही जागांवर मिळालेल्या यशामुळे पटोले हुरळून गेले आहेत. त्यांच्या या सरंजामशाहीला महाराष्ट्राच्या राजकारणात थारा दिला जाणार नाही, अशी टीका जाधव यांनी केली आहे. पुरोगामी महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेस बट्टा लावणाऱ्या या कृतीबद्दल प्रायश्चित्त म्हणून पटोले यांनी राजकीय संन्यास घेऊन बुवाबाजी सुरू करावी व कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदावर पाणी सोडावे, अन्यथा त्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन उभारू, असा इशाराही जाधव यांनी दिला आहे.

हेही वाचा –

SCROLL FOR NEXT