मनमाड : पुढारी वृत्तसेवा
येथील जमधाडे चौकातील रुक्मिणी निवास या इमारतीच्या वरच्या मजल्यावरील खोलीत ५० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून, मृत व्यक्ती हॉटेलमध्ये काम करीत असल्याची माहिती समोर आली. त्याच्या मृत्यूबाबत उलट सुलट चर्चा सुरू असून, पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
चौकात मटण मार्केटला लागून असलेल्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील खोलीतून दुर्गंधी येत असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विजय करेसह इतर अधिकारी, कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.
त्यांना कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. त्याच्या खिशातील आधार आणि पॅनकार्डवर त्याचे नाव अजय हिरामण पवार (५०, रा. एमजीआय कोकण वसाहत, कल्याण) असल्याचे दिसून आले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. त्याचा अहवाल आल्यानंतर मृत्यूच्या कारणाचा उलगडा होईल.
अजयचा घटस्फोट झाल्यानंतर तो मनमाडला आला आणि येथे एका हॉटेलमध्ये काम करीत होता. त्याचा मृत्यू किमान तीन ते चार दिवसांपूर्वी झाला असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे हॉटेलमध्ये कामावर न गेल्यामुळे हॉटेल मालकाने त्याची चौकशी केली की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.