इगतपुरी (नाशिक) : वैतरणा धरण परिसरातील झारवड बुद्रूक येथे रविवारी (दि. 4) दोन अल्पवयीन मुले बुडाली होती. त्यातील नक्ष नितीन मगरे (12, रा. ठाणकरपाडा, कल्याण) घटनेनंतरच मृतदेह सापडला होता. दुसरा, 15 वर्षीय मुलगा प्रेम रमेश मोरे (मोग, ता. रिसोड, वाशिम) याचा मृतदेह सोमवारी (दि. 5) सकाळी धरणक्षेत्रात पाण्यावर तरंगताना मिळून आला.
रविवारी (दि.4) रोजी वैतरणा धरणक्षेत्रात झारवड येथे सुरू असलेल्या फार्म हाऊसच्या कामस्थळी कल्याण येथील कुटुंबातील आठ ते दहा जण पर्यटनासाठी आले होते. त्यापैकी नक्ष मगरे याच्यासह फार्म हाऊसवर कामगार असलेल्या कुटुंबातील प्रेम मोरे असे दोघे व तीन ज्येष्ठ मंडळी पाण्यात उतरले होते. मात्र, तेथील खोल खड्ड्याचा अंदाज या मुलांना नसल्याने एकापाठोपाठ दोघेही त्या ठिकाणी बुडाले. इतरांना त्यांना वाचविण्याचीही संधी मिळाली नाही. मगरेचा मृतदेह काही वेळातच तीरावर मिळून आला होता. परंतु मोरेचा शोध घेऊनही मृतदेह सापडला नव्हता. सायंकाळी उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते. रात्री अंधारामुळे शोधकार्य थांबवण्यात आले होते. सोमवारी सकाळी पुन्हा शोध कार्याला सुरुवात करण्यात आली असता धरण क्षेत्रात पाण्यावर तरंगताना मृतदेह निदर्शनास आला. घोटी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांच्यासह पथकाने पंचनामा करून नोंद केली.