

इगतपुरी (नाशिक): तालुक्यातील वैतरणा धरणावर फिरण्यास आलेल्या पर्यटकांमधील दोन अल्पवयीन मुले पाण्यात बुडल्याची घटना रविवारी (दि. 4) सायंकाळी उघडकीस आली. यातील एकाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले, तर दुसऱ्याचा शोध घेतला जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी (दि.4) रोजी कल्याण येथून काही जण कुटुंबासह वैतरणा धरणावर फिरण्यास आले होते. त्यातील दोन मुले धरणाच्या पाण्यात अंघोळ करण्यासाठी उतरले होते. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले. याबाबत माहिती कळताच घोटी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत स्थानिक पाणबुड्यांच्या सहायाने शोधकार्य सुरू केले. त्यात लक्ष नितीन मगरे या १२ वर्षीय मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले, तर प्रेम रमेश मोरे (15) याचा अंधार पडेपर्यंत शोध घेतला मात्र, आढळून न आल्याने शोधकार्य थांबवण्यात आले असून, सोमवारी (दि. 5) सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, वैतरणा धरण परिसरात कुठेही सुचना फलक लावलेले नाहीत तसेच कुठेही धरणाचे सुरक्षारक्षक नसल्याने दरवर्षी अनेक पर्यटकांना पाण्यात बुडून जीव गमवावा लागत आहे. या ठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी उपाय योजना करण्याची गरज स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.