नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या नाशिकचे प्रश्न आता चक्क उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दरबारात पोहोचले आहेत. नुकतेच नाशिक दौऱ्यावर आलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांची स्थानिक उद्योजकांनी भेट घेत, नाशिकच्या विमानसेवेपासून ते रिंग रोडपर्यंतच्या विविध प्रश्नांबाबतचे निवेदन दिले होते. त्याचा पाठपुरावा करण्यासाठी खासदार तटकरे यांनी लगेचच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना तब्बल तीन पानी पत्र लिहित, याप्रश्नी बैठक बोलाविण्याची मागणी केली.
शनिवारी (दि. ५) खा. तटकरे नाशिक दौऱ्यावर असता, निमा अध्यक्ष आशिष नहार, उपाध्यक्ष मनीष रावल, सचिव राजेंद्र अहिरे, आयमा सहसचिव योगिता आहेर, कैलास पाटील, राजेंद्र कोठावदे, राधाकृष्ण नाईकवाडे आदींनी भेट घेत, नाशिकच्या उद्योग क्षेत्रातील समस्यांचा पाढा वाचत याबाबत राज्य आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याची मागणी केली होती. त्यानंतर अवघ्या दोन दिवसांत म्हणजे सोमवारी (दि. ७) खा. तटकरे यांनी उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहित नाशिकच्या उद्योग क्षेत्राचे प्रश्न सोडविण्यासाठी बैठक बोलविण्याची मागणी केली. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या नाशिकचे प्रश्न अजूनही 'जैसे थे' आहेत. विशेषत: उद्योग क्षेत्राबाबत आतापर्यंत अनेक आश्वासने दिली आहेत. मात्र, या आश्वासनांची अद्याप पूर्तता झाली नाही. गेल्या लोकसभा, विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उद्योजकांना आश्वासने दिली होती. मात्र, तीदेखील हवेत विरल्याने, प्रशासनावर पकड असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दरबारात प्रश्न गेल्याने ते मार्गी लागणार काय? याबाबत उद्योजकांमध्ये उत्सुकता आहे.
नाशिक-कल्याण-पनवेल जोडणी मार्ग तयार आहे. त्यामार्गे रेल्वेसेवा सुरू करावी. नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे व नाशिक-पुणे औद्योगिक कॉरिडॉरला गती मिळावी, दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉरच्या दुसऱ्या टप्प्यात नाशिकचा समावेश व्हावा. निओ मेट्रो प्रकल्प लवकर सुरू व्हावा. वाढवण बंदरापर्यंत समृद्धी महामार्गाचा विस्तार करणे. कुंभमेळ्यासाठी पायाभूत सुविधा वाढवाव्यात. नाशिकमध्ये आयटी पार्कसाठी कार्यवाही करावी. ओझर विमानतळ येथून नवी दिल्ली, मुंबई, बंगळुरू यांसारख्या प्रमुख शहरांसाठी अतिरिक्त सेवा मिळावी. आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करावीत.
खा. तटकरे यांनी नाशिक-मुंबई व नाशिक-पुणे महामार्गांबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही पत्र लिहिले आहे. नाशिकहून मुंबईकडे जाताना घोटी टोल नाका येथे व समृद्धीवरून प्रवास करताना अतिरिक्त १६० रुपये टोल भरावा लागतो. तिकडून येताना अवघ्या एक किमीसाठी पडघा येथे टोल द्यावा लागतो. पुणे महामार्गाची अवस्था वाईट झाली असून, त्यामुळे वाहनचालकांचे प्रचंड हाल होत असल्याचे तटकरे यांनी पत्रात म्हटले आहे.