

नाशिक : राज्याच्या मुख्यमंत्रीपदी नाशिकचे दत्तक पिता अर्थात देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा विराजमान झाल्याने नाशिककरांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. कुंभनगरीच्या विकासाला बूस्ट मिळणार असून निओ मेट्रो, आयटी हब, लॉजिस्टिक पार्क, नाशिक-पुणे रेल्वेसारख्या प्रकल्पांना आता गती येईल. त्यामुळे राज्यातच नव्हे तर, देशभरातील वेगाने विकसित होणाऱ्या शहरांच्या यादीत आता नाशिकला अव्वल स्थान मिळेल, असा आशावाद आमदारांनी व्यक्त केला आहे.
२०१७ मधील महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणूक प्रचारादरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाशिकला दत्तक घेत असल्याचे विधान केले होते. नाशिककरांनीदेखील फडणवीस यांच्या सादेला प्रतिसाद देत भाजपच्या हाती महापालिकेची एकहाती सत्ता सोपविली. यानंतर फडणवीस यांनी निओ मेट्रोच्या रूपाने देशातील पहिली टायरबेस मेट्रो नाशिकला सुरू करण्याची घोषणा केली. त्यासाठी महारेल आणि सिडको मार्फत सर्वेक्षणही झाले. मेट्रो निओचे मार्ग, त्यासाठी लागणारा निधी यासंदर्भातील प्रस्तावाला महासभेत मंजुरी देत राज्य शासनामार्फत केंद्राकडे प्रस्ताव पाठविण्यात आला. मात्र, या घोषणेला आता सात वर्षांचा कालावधी उलटला तरी निओ मेट्रोला केंद्राकडून हिरवा कंदील मिळू शकलेला नाही. मुख्यमंत्रिपदी पुन्हा फडणवीस परतल्यामुळे निओ मेट्रोला आता चालना मिळणार आहे.
महापालिकेतील भाजपच्या गत सत्ताकाळात आयटी पार्क, लॉजिस्टिक पार्कचा प्रस्ताव पुढे आला होता. केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी लॉजिस्टिक पार्कला तत्त्वत: मंजुरीही दिली. त्यानंतर मात्र या दोन्ही प्रकल्पांना पुढे चालना मिळू शकलेली नाही. आता दत्तक पित्याकडून या प्रकल्पांच्या अंमलबजावणीची अपेक्षा आहे. नाशिक-पुणे महामार्गावरील द्वारका ते दत्तमंदिर दरम्यान डबलडेकर उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्तावही मार्गी लागेल, असा विश्वास भाजप आमदारांकडून व्यक्त केला जात आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी घोषणा फडणवीस यांनी विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान केली होती. आता या आश्वासनपूर्तीकडे नाशिककरांचे लक्ष राहणार आहे. नाशिकचे विविध प्रकल्प केंद्र व राज्य शासनाच्या मान्यतेसाठी प्रलंबित आहेत. या प्रकल्पांना फडणवीस चालना देतील, अशी अपेक्षा आहे.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस पुन्हा विराजमान झाल्यामुळे नाशिकच्या विकासाला गती मिळेल. फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी नाशिककरांनी देवाला साकडे घातले होते. नाशिककरांचा नवस पूर्ण झाला आहे. आता निओ मेट्रो, आयटी हब, नमो पार्क, विद्युत तारांचे भूमिगतीकरण आदी प्रकल्पांना चालना मिळेल.
- सीमा हिरे, आमदार, नाशिक पश्चिम.
भयमुक्त ड्रग्जमुक्त नाशिकसाठी उभारलेल्या लढ्याला फडणवीस मुख्यमंत्री झाल्यामुळे बळ प्राप्त झाले आहे. आयटी हब, लॉजिस्टिक पार्क आदी प्रकल्पांना निश्चितपणे चालना मिळेल. दत्तक नाशिकला लाभ होईल.
- प्रा. देवयानी फरांदे, आमदार, नाशिक मध्य
देवेंद्र फडणवीस यांचे नाशिकवर विशेष प्रेम आहे. आता ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यामुळे नाशिकच्या विकासाला गती प्राप्त होईल. विशेषतः आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी भरीव निधी मिळेल, यात शंका नाही.
- अॅड. राहुल ढिकले, आमदार, नाशिक पूर्व
राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्या शपथविधीने पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले, याचा अभिमान आहे. यामुळे 'लाडकी बहीण 'सह जनहिताच्या योजना या पुढील काळातही सुरू राहतील, मतदारसंघाच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी यामुळे मिळू शकेल.
- सरोज आहिरे, आमदार, देवळाली