Daytime theft, roof leak in Zilla Parishad!
नाशिक : जिल्हा परिषद इमारतीत चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. भरदिवसा अध्यक्ष दालनाशेजारील प्रसाधनगृहातील वॉशबेसिनचे सर्व नळ चोरट्यांनी चोरून नेले असून, त्यासाठी बेसिनदेखील फोडण्यात आले आहे. तसेच अडगळीच्या खोलीतील वातानुकूलित यंत्र चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्याला कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडले होते. विशेष म्हणजे, अध्यक्ष दालनाबाहेरील व्हरांड्यातील छत पावसामुळे गळत असून, या इमारतीची दुरुस्ती अवघ्या तीन महिन्यांपूर्वीच करण्यात आली होती.
गेल्या वर्षीही याच इमारतीची दुरुस्ती करण्यात आली होती. अशा दुय्यम दर्जाच्या कामामुळे दुरुस्तीचा नेमका फायदा काय, असा सवाल उपस्थित होत आहे.
अध्यक्ष दालनाबाहेरील दुसऱ्या बेसिनचा नळदेखील चोरट्यांनी उडविल्याचे समोर आले आहे. तेथील दिवाबत्ती काही दिवसांपासून बंद आहे. महिला कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन प्रकरणामुळे चर्चेत आलेली जिल्हा परिषद आता चोरीच्या घटनांनी चर्चेत आली आहे. येथील अंतर्गत सुरक्षा यंत्रणा सक्षम आहे का, याबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत कार्यालयीन स्वच्छता, पाणी व बसण्याच्या सुविधा याबाबत सूचना दिल्या होत्या. १५ जानेवारी ते १ मेदरम्यान स्वच्छतेचा आढावा घेण्यात येऊन कृती आराखडा राबवण्यात आला होता. सुरुवातीला स्वच्छता राखली गेली, परंतु सध्या मुख्य इमारतीतील प्रसाधनगृहे अस्वच्छ असून, तेथून दुर्गंधी पसरत आहे. महिलांना मूलभूत सुविधांसाठीही अडचणींचा सामना करावा लागत आहे. तुटलेले नळ, पाण्याचा अभाव यामुळे महिला कर्मचाऱ्यांची विशेषतः कुचंबणा होत आहे.
माझ्यापर्यंत अद्याप तक्रार आलेली नाही. मी स्वतः पाहणी करते. काही गैरसोय असेल तर माहिती घेऊन सुधारणा करण्यात येतील.- आशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.