ठळक मुद्दे
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर २१४ कोटींच्या द्वारका चौक सुधार प्रकल्पाला केंद्र सरकारची मंजुरी
नाशिक महापालिकेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये खर्च करून पादचारी मार्ग तयार केला
द्वारका सर्कल हटवून आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानावर आधारित सिग्नल सुरू
नाशिक : नाशिक शहरातील जंक्शन असलेल्या द्वारका चौकातील वाहतूक कोंडीवर अखेर कायमस्वरूपी तोडगा निघाला आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर २१४ कोटींच्या द्वारका चौक सुधार प्रकल्पाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. केंद्रीय भुपृष्ठ वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी 'एक्स'पोस्टद्वारे याविषयीची माहिती दिली आहे. या प्रकल्पांतर्गत द्वारका चौकात ८०० मीटर लांबीचा अंडरपास तयार केला जाणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी या प्रकल्पाचे काम पूर्ण केले जाणार आहे.
द्वारका चौक हा नाशिक शहरातील प्रमुख चौक आहे. मुंबई-आग्रा महामार्ग आणि नाशिक-पुणे महामार्गाला जोडणाऱ्या या चौकात सहा बाजुने रस्ते एकत्र येतात. त्यामुळे या चौकात होणारी वाहतुक कोंडी जीवघेणी ठरत आहे. ही कोंडी कमी करण्यासाठी अनेक उपाय योजले गेले. महापालिकेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये खर्च करून पादचारी मार्ग तयार केला गेला. परंतु हा प्रयोग सपेशल अपयशी ठरला. पादचारी मार्ग भिकाऱ्यांचा अड्डा बनला. त्यानंतर या चौकातील वाहतुक बेटाचा आकार कमी केला गेला. परंतू त्याचा उपयोग झाला नाही. चौकात अतिक्रमण हटाव मोहीमही देखील राबविली गेली.
परंतु कोंडी 'जैसे थे' राहिली. अखेर द्वारका सर्कल पूर्णपणे हटवून तेथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानावर आधारित सिग्नल सुरू करण्यात आले; यात काही प्रमाणात यश आले असले तरी कोंडीचा प्रश्न पुर्णपणे सुटू शकलेला नाही. हा प्रश्न सोडविण्यासाठी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ तसेच आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी स्थळ पाहणी करत उपाययोजनांचे अधिकाऱ्यांना आदेश दिले. हा प्रश्न अधिक चिघळल्यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर येथे बैठक घेत राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणामार्फत (न्हाई) निधी खर्च करून वाहतूक समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा अधिकाऱ्यांनी बैठक घेत उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला. महापालिकेच्या वाहतूक शाखेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या वाहतूक सर्वेक्षणाचा आधार घेत अखेर या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात आला आहे. द्वारका चौका सुधारण्यासाठी २१४ कोटींच्या खर्चाला मान्यता देण्यात आल्याचे मंत्री गडकरी यांनी स्पष्ट केले आहे.
आठशे मीटरचा अंडरपास
प्रकल्प आराखड्यानुसार सारडा सर्कल कडून नाशिकरोडकडे जाताना कावेरी हॉटेल ते कराड भत्ता सेंटरपर्यंत ८०० मीटरचा अंडरपास तयार केला जाणार आहे. यातून नाशिकरोडहून नाशिककडे व नाशिकहून नाशिकरोडच्या दिशेने दोन्ही बाजूची वाहतूक होईल. या अंडरपासच्या उभारणीसाठी यापूर्वी तयार करण्यात आलेला पादचारी मार्ग मात्र तोडला जाणार आहे. नाशिकरोड होऊन धुळे येथे जाण्यासाठी डावीकडे वळण घेऊन वडाळा नाका सिग्नल येथे तीनशे मीटरचा अंडरपास तयार केला जाणार आहे. हा अंडरपास पुढे उड्डाणपुलाला जोडला जाईल. धुळे कडून नाशिक रोड कडे जाताना देखील तीनशे मीटरचा अंडरपास तयार केला जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या वाहतुक शाखेकडून देण्यात आली आहे.
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील द्वारका चौक सुधारणेकरीता २१४ कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पामुळे नाशिक मधील वाहतूक सुरळीत होईल आणि मालवाहतूक व सार्वजनिक वाहतुकीची कार्यक्षमता सुधारण्यास मदत होईल.नितीन गडकरी, केंद्रीय रस्ते व वाहतुक मंत्री.
माझ्या अजेंड्यावरील हा प्रश्न मार्गी लागतोय याचा आनंद आहे. नितीन गडकरी याबाबत सकारात्मक होतेच, थोडा उशीर झाला असला तरी प्रकल्प होतोय हे महत्वाचे. द्वारका ते नाशिकरोड उड्डाणपुलासाठी देखील संघर्ष सुरूच राहील.राजाभाऊ वाजे, खासदार, नाशिक
'पुढारी'च्या पाठपुराव्याला यश
द्वारका चौकातील वाहतुक कोंडीतून नाशिककरांची सुटका व्हावी, यासाठी दैनिक 'पुढारी'ने सातत्याने पाठपुरावा केला. प्रारंभी चौकातील सर्कल हटविले गेले. मात्र, अशातही वाहतुक कोंडीचा जाच कायम असल्याने, 'पुढारी' टीमने १८ जून रोजी 'सर्कल हटविले, भुयारी मार्गाचे काय?' अशा मथळ्याखाली 'ग्राउंड रिपोर्ट' मांडत द्वारकेवर होणाऱ्या वाहतुक कोंडीची वेगवेगळे कारणे अवगत करून दिली. तसेच वाहतूक कोंडी फोडण्यासाठी काय उपाययोजना आवश्यक आहेत, यावर देखील प्रकाशझोत टाकला. अखेर द्वारका चौकातील कोंडी फोडण्यासाठी २१४ कोटींचा निधी मंजूर झाल्याने, 'पुढारी'ने केलेल्या पाठपुराव्यास यश आले आहे.