नाशिक, डॉ. राहुल रनाळकर
चित्रमहर्षी दादासाहेब फाळके या महामानवाने भारतीय चित्रपटविश्वाला आकार दिला आणि योगायोगाने ते नाशिकचे होते. म्हणूनच, नाशिकच्या मातीत चित्रकलेचा, अभिनयाचा, दिग्दर्शनाचा आणि कल्पकतेचा आत्मा वसलेला आहे. अशा या भूमीवर ‘फिल्म सिटी’ उभी राहावी, हे केवळ स्वप्न नाही तर सांस्कृतिक आरक्षण मिळवण्याचा अधिकार आहे. कारण ही भूमी भारतीय सिनेमाची जन्मभूमी आहे.
आज तीन दशकांपूर्वी पाहिलेलं हे स्वप्न सत्यात उतरायच्या उंबरठ्यावर आहे. राज्य सरकारने सुमारे 130 एकर जागा या प्रकल्पासाठी दिली असून, ती सांस्कृतिक विभागाकडे वर्ग करण्यात आली आहे. आता या स्वप्नाला वास्तवात आणण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती आणि निश्चित टाईमफ्रेमची गरज आहे.
नाशिक फिल्म सिटीची कल्पना- ३० वर्षांचा संघर्ष
नाशिकमध्ये फिल्म सिटी उभारण्याची कल्पना नवी नाही. 1992- 93 मध्ये बबनराव घोलप यांच्या ‘निलांबरी’ या चित्रपटामुळे या विषयावर तेव्हा चर्चा सुरु झाली होती. प्रत्यक्षात फिल्म सिटीचं प्रपोजल 2010 मध्ये शासनाकडे सादर करण्यात आलं आणि गोरेगाव फिल्म सिटी प्रशासनाने देखील त्यास मान्यता दिली होती. त्या काळात नाशिक महापालिकेकडून केवळ 2 कोटींचा निधी आवश्यक होता, पण तोही उपलब्ध झाला नाही. त्यावेळी कलाकारांचे दुःख ओळखणारे छगन भुजबळ यांनी पुढाकार घेतला होता. त्यांनी फिल्म सिटीसाठी दोन- तीन जागांचे पर्याय दिले होते, आणि शेवटी मुंढेगाव परिसरात सर्वेक्षणही झाले. पण तत्कालीन सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी या प्रकल्पावर ‘व्यावसायिकदृष्ट्या परवडणारा नाही’ असा शेरा मारल्यामुळे फाईल पुन्हा थंडबस्त्यात गेली. जिथे चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली गेली ते नाशिक मात्र सतत डावलले गेले. या सगळ्या काळात कलावंत आणि कला दिग्दर्शक श्याम लोंढे यांनी मात्र ‘किल्ला लढवणे’ सुरूच ठेवले. त्यांचा आग्रह होता ‘दादासाहेब फाळकेंची भूमी जर चित्रसृष्टीपासून वंचित राहिली, तर तो इतिहासावर अन्याय ठरेल.’
नाशिकचे भौगोलिक, सांस्कृतिक वैशिष्ट्य, चित्रिकरणासाठी आदर्श ठिकाण आहे. नाशिक हा असा जिल्हा आहे, ज्याच्या १० किलोमीटरच्या परिघात भारताची सर्व वैशिष्ट्ये सापडतात. मंदिरे, जैन व बुद्ध लेणी, प्राचीन खेडी, दऱ्या- धबधबे, झोपडपट्ट्या, गगनचुंबी इमारती, क्रीडांगणे, नद्या, जंगल परिसर, धरणे, गड-किल्ले हे सगळं एकाच ठिकाणी आहे. आज जगभर चित्रपट निर्माते ‘रिअल लोकेशन’वर शूटिंगला प्राधान्य देतात. नाशिकमध्ये ती सर्व दृश्य विविधता आहे जी हॉलिवूड किंवा दक्षिण भारतात शोधावी लागते. त्यात मुंबईपासून नाशिकचे अंतर अवघे ३ तास, मुंबई- पुणे ५ तास, तर कोल्हापूरच्या तुलनेत नाशिक म्हणजे अर्ध्याहून कमी प्रवासाचा कालावधी. त्यामुळे चित्रिकरणाच्या दृष्टीने नाशिकचे भौगोलिक स्थान अत्यंत सोयीस्कर आहे. शिवाय, नाशिकमधील जीवनशैली आणि खर्च मुंबई- पुण्याच्या तुलनेत ४० टक्के स्वस्त आहे. त्यामुळे लो- बजेट आणि मध्यम बजेट चित्रपटांसाठी नाशिक आदर्श आहे.
डिजिटल युगातील सिनेमा
आज जगात चित्रपट निर्मितीची संकल्पना पूर्णपणे बदलली आहे. हॉलिवूडमध्ये विशाल एलईडी स्क्रिन स्टुडिओ वापरले जातात, ज्यात कोणतेही दृश्य पार्श्वभूमी दाखवता येते. अशा अत्याधुनिक डिजिटल स्टुडिओंची गरज भारतातही वाढते आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे म्हणणे होते की, 130 एकर जागा कमी पडेल. 250-300 एकर जागा हवी. पण इथे बराचसा भाग डिजिटल अंगाने उभा राहिला तर नाशिक ती भारताची पहिली अत्याधुनिक एलईडी स्टुडिओ फिल्म सिटी ठरू शकते. येथे वेब सिरीज, ॲड फिल्म्स, डॉक्युमेंटरी, आंतरराष्ट्रीय चित्रपट, यांचं निर्मिती केंद्र बनू शकतं.
आर्थिक दृष्टीने सुवर्णसंधी
फिल्म सिटी म्हणजे फक्त चित्रपट नव्हे, तर संपूर्ण इकोनॉमिक झोन. गेल्या पाच वर्षांत नाशिकमध्ये चित्रपट व मालिकांच्या शूटिंगमुळे ३०० ते ४०० कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. हॉटेल, ट्रान्सपोर्ट, लाईट- डेकोरेशन, मेकअप, तंत्रज्ञ, फूड सर्विसेस, कारपेंटर, डेकोरेटर्स, छोटे दुकानदार अशा सर्वांनाच रोजगार मिळत आहे. नाशिकमध्ये दर महिन्याला एक तरी चित्रपट आणि तीन-चार मालिका शूट केल्या जात आहेत. म्हणजेच, हा उद्योग रुजू पाहतोय. फक्त संस्थात्मक स्वरूपात त्याला चालना देण्याची गरज आहे.
सांस्कृतिक वारसा आणि पर्यटनाचा संगम
लंडनने आजही शेक्सपियर थिएटर जपून ठेवले आहे. तेथील लोक त्याला सांस्कृतिक पर्यटनाचे केंद्र बनवले आहे. शेक्सपियरने वापरलेल्या वस्तु, पेन, वह्या, पुस्तके, कपडे हे आजही टिकवून ठेवले आहे. दादासाहेब फाळकेंचा वारसा असूनही आपण तो पर्यटन व सांस्कृतिक विकासासाठी वापरू शकलेलो नाही. हे आता करणे शक्य आहे. फिल्म सिटी उभी राहिल्यानंतर नाशिक ‘चित्रतीर्थ’ म्हणूनही ओळखले जाईल. आध्यात्मिक नाशिकबरोबरच सांस्कृतिक नाशिक जगासमोर येईल. धार्मिक पर्यटनाला कला पर्यटनाची जोड मिळेल, आणि संपूर्ण जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला नवी गती मिळेल.
शासन आणि नेत्यांची भूमिका
आजच्या घडीला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांमुळे या प्रकल्पाला पुन्हा गती मिळाली आहे. त्यांनी या जागेचा विषय मार्गी लावला असून, प्रकल्पाची दिशा निश्चित झाली आहे. फिल्म सिटीसाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सोयी वीज, रस्ते, पाणी, इंटरनेट, सुरक्षा या सर्व गोष्टी वेगाने उभाराव्या लागणार आहेत. ‘डेडलाईन’ निश्चित करून काम सुरू केल्यास पुढील दोन वर्षांत नाशिक फिल्म सिटी वास्तवात उतरणे शक्य आहे.
भविष्यातील शक्यता आणि आंतरराष्ट्रीय दृष्टी
भारतात दरवर्षी सुमारे २००० हून अधिक चित्रपट तयार होतात. जगात सर्वाधिक. त्यापैकी सुमारे 35 टक्के चित्रपट महाराष्ट्रात तयार होतात. त्यामुळे नाशिक फिल्म सिटी केवळ स्थानिक गरज नाही, तर राष्ट्रीय पातळीवरील आवश्यकता आहे. राजामौली सारखे दिग्दर्शक नाशिकमध्ये चित्रपटाचे मुहूर्त करण्यास इच्छुक आहेत. त्यांचे म्हणणे आहे, नाशिकमध्ये चित्रपटासाठी आवश्यक सर्व घटक आहेत. जर अशा आंतरराष्ट्रीय पातळीवरील टीम्स नाशिकमध्ये शूटिंग करतील, तर नाशिक परिसर भारतीय हॉलिवूड म्हणून उदयास येईल. दादासाहेब फाळकेंच्या भूमीत फिल्म सिटी उभारणे म्हणजे केवळ चित्रपटांचा प्रकल्प नव्हे, तर सांस्कृतिक आरक्षणाचे पुनरुज्जीवन म्हणायला हवे. जगात सर्वाधिक सिनेमे निर्माण करणारा देश भारत असूनही, त्याची जन्मभूमी नाशिक आजही प्रतीक्षेत आहे, हे दुःखद आहे. जर ही फिल्म सिटी उभी राहिली, तर नाशिक केवळ धर्मतीर्थ न राहता चित्रतीर्थ बनेल. ही फिल्म सिटी नाशिकच्या युवकांना नवे रोजगार, तंत्रज्ञान, ग्लोबल कनेक्टिव्हिटी देईल आणि भारताच्या सांस्कृतिक नकाशावर नाशिकचे नाव नव्या उंचीवर नेईल. आता वेळ आहे, फाईलींना नव्हे, स्वप्नांना चालना देण्याची.
गोरेगाव फिल्म सिटीची मर्यादा
मुंबईतील गोरेगाव फिल्म सिटीची क्षमता आता संपत चालली आहे. पूर्वी 700 एकर असलेली ही जागा आता केवळ 500 एकरांवर आली आहे. आजकाल अनेक टीव्ही मालिका 3 ते 15 वर्षे चालतात. ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ यासारख्या मालिकांनी तर 7-8 वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्यामुळे नवीन सेट उभारण्यासाठी गोरेगावमध्ये आता जागाच उरलेली नाही. परिणामी, नव्या चित्रसृष्टीसाठीचे पुढचे डेस्टिनेशन नाशिक ठरेल.
नाशिक नव्या संधींचे केंद्र
सरकारी फिल्म सिटी नाशिकमध्ये सुरु झाली, तर रामोजी फिल्म सिटीप्रमाणे खाजगी फिल्म सिटीही भविष्यात येथे उभ्या राहू शकतात, इतकी क्षमता इथे आहे. रामोजी राव फिल्म सिटी आता कालबाह्य डिझाइनमुळे बकाल वाटू लागली आहे. प्रेक्षकांना आणि निर्मात्यांनाही नव्या ठिकाणाची, नव्या दृश्यानुभूतीची गरज भासतेय, आणि ती नाशिक पूर्ण करू शकणार आहे.
पुढची जबाबदारी - नेतृत्वाची गरज
नाशिक फिल्म सिटीचे काम पीपीपी मॉडेलवर उभारले जाण्याची चिन्हे आहेत. या प्रकल्पाला आता गती देण्याची वेळ आली आहे. सध्या नाशिकला पालकमंत्री नसले तरी फिल्म सिटीचे “पालकत्व” घेणारे नेतृत्व आवश्यक आहे. या भूमिकेसाठी छगन भुजबळ आणि समीर भुजबळ सक्षम नेते ठरू शकतात. नाशिक फेस्टिव्हलमध्ये समीर भुजबळ यांनी दाखवलेली कलात्मक जाण याची साक्ष देते.
फिल्म सिटी’चे स्वप्न साकारू द्या
नाशिकमधील अनेक लोकेशन्स अजूनही अनएक्स्प्लोर आहेत. सिन्नरचे गोंदेश्वर मंदिर साऊथ इंडियन सिनेमाच्या तोडीचे लोकेशन ठरू शकते. त्र्यंबकेश्वर, काळाराम मंदिर ही नैसर्गिक आणि सांस्कृतिक स्थळे तर आधीपासूनच प्रसिद्ध आहेत. त्यामुळे आता जागा मिळाल्यानंतर फिल्म सिटीचा नारळ लवकरात लवकर वाढवला जावा, अशी सर्वांचीच अपेक्षा आहे.