नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरातील खड्डे आणि रस्त्यांच्या दुरुस्थेचा नागरिकांना त्रास होत असल्याचे मान्य करत, काही कामे यापूर्वीच सुरू व्हायला हवी होती, हे नाकारता येणार नाही, अशी कबुली शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सोमवारी (दि. १०) दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकच्या कामांचा विस्तृत आढावा घेतला असून, 'ज्यांचे कान टोचायचे त्यांचे टोचले आहेत', असे सांगत संबंधित यंत्रणांनी समन्वयातून काम करण्याचे निर्देश दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नाशिकमध्ये शिवसेना (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना भुसे यांनी शहरातील खड्डे, सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी, शिक्षक भरती, बोगस शिक्षक भरती, शालार्थ आयडी घोटाळा तसेच भूकंपाच्या धक्क्यांसह विविध विषयांवर भूमिका मांडली.
शहरातील रस्त्यांबाबत बोलताना भुसे म्हणाले, 'इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात रस्त्यांच्या कामांना मान्यता मिळाली आहे. मात्र, कामे करताना सर्व विभागांमध्ये समन्वय असणे आवश्यक आहे.
गॅस पाइपलाइन, पाणीपुरवठा आणि केबलची कामेही एकाचवेळी सुरू असतात. त्यामुळे रस्ता खोदला गेल्यास तो तातडीने बुजविण्याचा प्रयत्न झाला पाहिजे.' वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काही रस्त्यांवर वाहतूक वळविणे, वन-वे करणे यासारखे पर्यायही पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने राबवावेत, असे त्यांनी सांगितले.
'नाशिकला ऐतिहासिक आणि पौराणिक परंपरा आहे. सिंहस्थाच्या निमित्ताने मोठ्या संख्येने भाविक येणार आहेत. नागरिकांना होणारा त्रास नाकारता येणार नाही. अधिकारी ऐकत नसतील, तर वरिष्ठ पातळीवर ही बाब कानावर घालू,' असा इशाराही भुसे यांनी दिला.
शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू असून पवित्र पोर्टलवर नोंदणीला मुदतवाढ दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, आदिवासी विभाग तसेच संस्थांमधील जागांसाठी पात्र उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. क्रीडा, कला आणि इंग्रजी विषयांच्या शिक्षकांसह माजी सैनिकांनाही संधी दिली आहे, असे भुसे यांनी सांगितले.
टीईटी प्रकरण गंभीर असून, गैरप्रकार करणाऱ्यांना गोपनीय माहितीआधारे पकडले आहे. तपास सुरू असून दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. या प्रकरणात मकोका अंतर्गत कारवाईची मागणीही त्यांनी केली. शालार्थ आयडी घोटाळ्यात गुन्हे दाखल असून कायदेशीर कारवाई सुरू आहे. बोगस शिक्षक भरतीची चौकशी सुरू असून दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल, असे भुसे म्हणाले.
नाशिक परिसरातील भूकंपाच्या धक्क्यांबाबत तज्ज्ञांचा सल्ला घेतला जात असून, यासंदर्भातील विषय मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत मांडणार असल्याचे भुसे यांनी सांगितले. एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, असे स्पष्ट करत अनधिकृत शाळांना नोटीसा देऊन कागदपत्रांची पूर्तता न करणाऱ्या शाळांवर कारवाई केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. पोषण आहाराबाबत विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या आरोपांची चौकशी केली जाईल. आरोपात तथ्य आढळल्यास कारवाई होईल, असे भुसे यांनी स्पष्ट केले.